पनवेल : रामप्रहर वृत्त
आद्य कीर्तनकार नारदमुनींच्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल येथील ज्येष्ठ कीर्तनकार अनंत ऊर्फ नंदकुमार कर्वे यांच्या श्रीराम संकीर्तन या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि. 27) करण्यात आले. प्रसिद्ध कीर्तनकार राजेंद्रबुवा मांडेवाल यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अखिल भारतीय कीर्तन संस्था, दादर, दूरस्थ विद्यार्थी वृंद या संस्थेच्या नारद जयंतीच्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात हा सोहळा झाला. या सोहळ्यात प्रसिद्ध कीर्तनकार श्रीराम चितळे, चारुदत्त जोशी, समीर ओझे, कोरगावकर बुवा, चंद्रकांत मने, मुद्रक जयंत टिळक आदींनी सहभाग घेतला. युवा कीर्तनकार सुखदा मुळ्ये-घाणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रसिद्ध गायक अनिरुद्ध भिडे, अश्विनी भिडे, तबलावादक गणेश घाणेकर भाग्यश्री कर्वे, निनाद कर्वे आदींनी हा कार्यक्रम करण्यासाठी बहुमोल सहकार्य केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नारदमुनींच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर अनंत कर्वे यांनी नारदस्तवनाचे गीत सादर केले. अनिरुद्ध भिडे यांनी गीतरामायणातील एक पद सादर केले. त्यानंतर पुस्तक प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तकामध्ये श्रीरामचरित्रावर आधारित विविध आख्यानांचे पूर्वरंग व उत्तररंग समाविष्ट आहेत. नवोदित कीर्तनकारांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असल्याचे मनोगत राजेंद्रबुवा मांडेवाल यांनी व्यक्त केले.