एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्ण
कर्जत : बातमीदार
महावितरणच्या नेरळ सबस्टेशनमध्ये एक्स्प्रेस फिडरचे काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा योजनेतील पंपिंग स्टेशनला अखंडित वीजपुरवठा होऊन माथेरानला सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.
माथेरानला पाणीपुरवठा करण्यासाठी उल्हास नदीकाठी कुंभे येथे व जुम्मापट्टी तसेच वॉटर पाइप येथे पंपिंग स्टेशन आहेत. यापैकी कुठल्याही ठिकाणी पाच मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला तरी माथेरानला कमी पाणी येत होते. दिवसातून 3-4 वेळा वीजपुरवठा खंडित झाला तर संपूर्ण माथेरानचा पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. ते टाळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महावितरणच्या नेरळ सबस्टेशनमधून एक्स्प्रेस फिडर घेण्याचे प्रस्तावित केले होते, जेणेकरून जुम्मापट्टी व वॉटर पाइप येथील पंपगृहास 24 तास वीजपुरवठा मिळेल व माथेरानला जास्त प्रमाणात पाणीपुरवठा होईल. या कामांतर्गत नेरळ-माथेरान घाटातील नेरळ ते जुम्मापट्टीदरम्यान इलेक्ट्रिक ओव्हरहेड लाइन टाकण्यात आली आहे. महावितरणच्या नेरळ सबस्टेशन ते नेरळ पोलीस स्टेशन या टप्प्यातील रोड क्रॉसिंगचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.
वीजपुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे माथेरानला अनियमित पाणीपुरवठा होत होता, पण महावितरणच्या नेरळ सबस्टेशनमधील फिडरचे काम पूर्ण झाल्यानंतर माथेरानमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होईल. आता जुम्मापट्टी व वॉटर पाइप येथील सबस्टेशनमधील कामे पूर्ण करीत आहोत.
-किशोर देशमुख, अभियंता, एमजेपी