Breaking News

‘दिबां’च्या नावासाठी संघर्ष सुरूच राहणार!

24 जूनचे आंदोलन न भुतो न भविष्यती होणार; कृती समितीचा निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दुसर्‍या फेरीतील चर्चाही फिसकटली आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली ही भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि त्यांच्या गावांवर अन्यायकारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या हेकेखोर भूमिकेला आमचा प्रखर विरोध असून प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 24 जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे, अशी रोखठोक भूमिका सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी (दि. 21) येथे आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत मांडली. आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर असेल, तर आम्ही रिअ‍ॅक्शन मोडवर असणार आहोत, असा खणखणीत आवाजही कृती समितीने दिला आहे.
आगरी समाज मंडळाच्या पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, कॉ. भूषण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव वझे, रिपाइंचे कोकण अध्यक्ष तथा पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, कृती समितीचे खजिनदार जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, भाजपचे युवा नेते दशरथ भगत, कामगार नेते सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता रूपेश धुमाळ, दीपक पाटील, राजेश गायकर, सीमा घरत यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगण्यात आले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासंदर्भात रविवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे फिसकटली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून एकदा उठून गेले. कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा न करताच मुख्यमंत्री निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने 24 जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला आहे.
भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. सर्व स्तरांतून तिला पाठिंबा मिळत आहे. खरंतर ही मागणी सन 2008पासूनची आहे. असे असतानाही राज्यातील ठाकरे सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले असून तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमार्फत करून घेतला आहे. त्यास रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील ‘दिबा’प्रेमी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हा असंतोष 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आला. तरीही विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, अशी अडेलतट्टू भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
दरम्यान, 24 जूनच्या आंदोलनाचा धसका राज्य सरकारने घेतला असून हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्याचबरोबर नोटीसा बजावण्याचे कामही सुरू आहे, तर दुसरीकडे दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध करणारी मंडळी विविध क्लुप्त्या वापरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे सांगून ‘दिबां’च्या नावासाठी कितीही विरोध झाला तरी हे आंदोलन होणारच, असेही लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने या वेळी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तयारी संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना हे आंदोलन किमान एक लाख लोकांचा सहभाग असणारे ’न भुतो न भविष्यती’ असे असणार आहे. पोलीस प्रशासन आंदोलन रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करेल, मात्र आमचीही तशी तयारी झाली आहे. ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे. 24 जूनच्या घेराव आंदोलनात या व्यापक लढ्याची पुढील भूमिका मांडण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सिडको घेराव आंदोलनाची जोरदार तयारी पूर्णत्वास आली असून, त्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या विभागनिहाय बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. ‘आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दिबांचंच नाव!,’ अशी ठाम भूमिका ‘दिबा’प्रेमी जनतेने घेतली आहे. शांततापूर्ण स्वरूपात हे आंदोलन केले जाणार असून त्या दृष्टीने नियोजन व तयारी केली आहे.

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आज आम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी महाराजांच्या नावाची त्यांची भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. महाराजांच्या नावाने मुंबईत विमानतळ आहे. एका विमानतळाला नाव असताना तांत्रिकदृष्ट्या तेच नाव दुसर्‍या विमानतळाला देता येणार नाही.    
-आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष सर्वपक्षीय कृती समिती

दि. बा. पाटीलसाहेबांनी जनतेची अहोरात्र सेवा केली आहे. सामान्य माणसाचा आवाज त्यांनी बुलंद केला. त्यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यायला हवे. तो सर्व समाजाचा हक्क आहे व तो मिळालाच पाहिजे.
-संतोष केणे, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply