Breaking News

पंजाबचा राजस्थानवर 12 धावांनी विजय

मोहाली : वृत्तसंस्था

मोहालीच्या मैदानावर पंजाबने पाहुण्या राजस्थानला 12 धावांनी धूळ चारली. राहुलचे अर्धशतक (52) आणि मिलरची फटकेबाज खेळी (40) यांच्या बळावर पंजाबने राजस्थानला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 170 धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात 11 चेंडूंत 31 धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.

183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या लयीत असलेला जोस बटलर झेलबाद झाला आणि राजस्थानला पहिला धक्का बसला. बटलरने 1 चौकार आणि 2 षटकार खेचत 23 धावा केल्या. अश्विनला आडवा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन त्रिफळाचीत झाला. सॅमसनने 21 चेंडूंत 27 धावा केल्या. सलामीला आलेला राहुल त्रिपाठी अर्धशतक करून माघारी परतला. त्याने 45 चेंडूत 50 धावा केल्या. धोकादायक फलंदाज टर्नर हा मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा जोफ्रा आर्चरदेखील लवकर बाद झाला. पाठोपाठ कर्णधार अजिंक्य रहाणे फटकेबाजीच्या नादात बाद झाला. त्याने 21 चेंडूंत 26 धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीने फटकेबाजी करत 11 चेंडूंत 31 धावा केल्या, पण त्याची फटकेबाजी राजस्थानला विजय मिळवून देऊ शकली नाही.

त्याआधी, राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तडाखेबाज फलंदाजी करणारा ख्रिस गेल बचावात्मक फटका खेळताना माघारी परतला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. गेलने 22 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकार खेचत 30 धावा केल्या. नव्या दमाचा मयंक अग्रवाल मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि पंजाबला दुसरा धक्का बसला. मयंकने 12 चेंडूंत 1 चौकार आणि 2 षटकार यांच्या साहाय्याने 26 धावा केल्या. मिलरने पंजाबच्या धावसंख्येत भर घालत मोलाचा वाटा उचलला. त्याने 40 धावा केल्या. अखेरच्या षटकात अश्विनने 4 चेंडूंत 17 धावा करत पंजाबला 182 धावांचा पल्ला गाठून दिला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply