कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय आरोग्य विभागाची आढावा बैठक
पनवेल : वार्ताहर
कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तज्ज्ञांनी कोविडची तिसरी लाट येण्याचे भाकित केले आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासन संभाव्य तिसर्या लाटेला रोखण्यासाठी सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने आयुक्तांनी वैद्यकिय आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या वेळी विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली.
पहिल्या व दुसर्या लाटेतील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता तिसर्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी करण्यात येणार्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. या वेळी, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी यासंदर्भातील पॉवर पॉईंट प्रेझेटेंशन केले. ऑक्सिजन प्लॅन्टचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना या वेळी अधिकार्यांना देण्यात आल्या. कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेमध्ये आवश्यक असणारे आयसीयू खाटा, ऑक्सिजन खाटा, साध्या खाटा, लहान मुलांच्या आयसीयू खाटा, ऑक्सिजन खाटा यांच्या नियोजनांवर चर्चा करण्यात आली.
या अनुषंगाने खासगी रूग्णालये, शासकीय रूग्णालये, पालिकेचे रुग्णालय तेथील सोयी सुविधा वाढविण्यावर अधिकार्यांनी भर द्यावा, त्या दृष्टीने तातडीने कामास लागावे असे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. तिसर्या लाटेमध्ये लागणारी महत्त्वाची औषधे पालिकेने खरेदी करून ठेवावी जेणे करून ऐनवेळी औषधांची कमतरता पडणार नाही. यासाठी प्रमुख विक्रेत्याबरोबर चर्चा करावी आणि महत्वाची औषधे खरेदी करावी अशा सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. तिसर्या लाटेत वॉर रुम अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पालिकेने उभा करावे आणि वॉर रूम अधिक बळकट करावी असे आदेश वैद्यकिय आरोग्य विभागाला आयुक्तांनी दिले.
या वेळी उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, बाबासाहेब चिमणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक, डॉ. प्रियांका माळी, साद देशमुख, डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, स्वप्नाली चौधरी, महाले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आत्तापर्यंत झालेले शासकिय व खाजगी लसीकरणाचा आढावा घेऊन, जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी उपाय योजनांवर भर द्यावा, लसीकरण रोज व्हावे यासाठी प्रयत्न करा अशा सूचना यावेळी आयुक्तांनी वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper