Breaking News

भारताने इतिहास रचला 41 वर्षांनी हॉकीमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक

टोकियो ः वृत्तसंस्था

भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा पराभव करीत कांस्यपदक जिंकले. तब्बल 41 वर्षांनंतर भारताला हॉकीमध्ये पदक मिळाले. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने बलाढ्य जर्मनीचा 5-4ने पराभव केला. सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करीत होता. गोलकीपरशिवाय खेळणार्‍या जर्मनीला सामन्यातील आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त वेळ किंवा पेनल्टी शूटआऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामना बरोबरीत सोडवणे आवश्यक होते. या प्रयत्नात असतानाच अगदी सामन्यातील शेवटची सहा सेकंद शिल्लक होती तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता, तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास 41 वर्षांनी पदकावर नाव कोरले जाणार होते. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणार्‍या गोलकीपर श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. हा गोल झाला असता, तर सामना अतिरिक्त वेळेत गेला असता आणि तिथेही गोल झाला नसता, तर पेनल्टी शूटआऊटने विजेता निश्चित करण्यात आला असता, मात्र भारतीय संघाने आपला संयम कायम राखत सामना 5-4च्या फरकाने जिंकला. रुपिंदर पाल सिंग, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार आणि अमित रोहित यांच्यासारखे जगातील चार सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर संघात असतानाही पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारताची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. तरी भारताने सांघिक खेळाच्या जोरावर तब्बल 41 वर्षांनी कांस्यपदकावर नाव कोरले आहे.

पंतप्रधान मोदींकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचे कौतुक केले. त्यांनी कर्णधार मनप्रीत सिंह आणि प्रशिक्षक ग्राहम रीड यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘मनप्रीत खूप खूप शुभेच्छा. तू आणि तुझ्या संघाने जे काही केले आहे, त्यामुळे संपूर्ण देश आज आनंदाने नाचत आहे. संपूर्ण संघाने खूप मेहनत केली. माझ्याकडून संपूर्ण संघाला शुभेच्छा. आज संपूर्ण देशाला तुमचा गर्व वाटत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे पदक आपल्या देशातील सर्व कोरोना योद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचार्‍यांसाठी आहे. हा विजय त्यांना समर्पित करीत आहे.

-मनदीप सिंग, भारतीय कर्णधार

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply