कोलकाता : वृत्तसंस्था
आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुसर्या विजयाची नोंद केली आहे. बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्यांच्यात मैदानात 10 धावांनी मात दिली. 214 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र मधल्या फळीत नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.
सलामीवीर ख्रिस लिन, सुनील नारायण आणि शुभमन गिल हे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. डेल स्टेन आणि नवदीप सैनीने त्यांना माघारी धाडले. भरवशाचा रॉबिन उथप्पाही झटपट माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करीत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. राणाने नाबाद 85, तर रसेलने 66 धावा केल्या.
त्याआधी, कर्णधार विराट कोहलीचे आक्रमक शतक आणि मोईन अलीने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर बंगळुरू संघाने 213 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बंगळुरूच्या फलंदाजांनी आश्वासक फलंदाजी केली. मोईन अलीने 66, तर कर्णधार विराट कोहलीने 58 चेंडूंत 100 धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर पार्थिव पटेल आणि अक्षदीप नाथ झटपट माघारी परतले, मात्र यानंतर विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसर्या विकेटसाठी धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरूने या सामन्यात आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला.