Breaking News

आघाडी सरकारविरोधात आज आंदोलन; ओबीसी आरक्षणावरून भाजपची आक्रमक भूमिका, सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? खुलासा करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणार्‍या आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी (दि. 15) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात उत्तर रायगड जिल्हाही सहभागी होणार आहे, अशी घोषणा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. त्यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे, मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणार्‍या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकीलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणार्‍या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणार्‍या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, असे वारंवार सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे 15 सप्टेंबर रोजी आंदोलन केले जाईल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.

राज्यभर होणार निदर्शने

ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणार्‍या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे पुन्हा राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी याबाबत मंगळवारी घोषणा केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कुटे व टिळेकर बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply