Breaking News

रायगडात आज मतदान, प्रशासन सज्ज

15 हजार कर्मचार्‍यांची नेमणूक

अलिबाग : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. 23) मतदान होत आहे. मतदारसंघात 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे. 15 हजार कर्मचार्‍यांची नेमणूक  करण्यात आली आहे. मतदारसंघात 16 लाख 51 हजार 560 मतदार  2179 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 ते 19 या वयोगटातील तरुण 35 हजार 452 नवे मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सात मतदान केंद्र महिला चालवणार आहेत. एक केंद्र दिव्यांग कर्मचारी संचालित आहे. 10 मतदान केंद्र ही क्रिटीकल पोलिंग स्टेशन म्हणून निश्चित करण्यात आलेले आहेत. 2228 पोलीस कर्मचारी व 800 गृहरक्षक दालाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर या वेळी उपस्थित होते.

रायगडात 16 उमेदवार

रायगड लोकसभा मतदारसंधात 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनंत गीते (शिवसेना), सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), नथुराम भगुराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी), सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी), मिलिंद भागुराम साळवी (बहुजन समाज पार्टी), मधुकर महादेव खामकर (अपक्ष), संदीप पांडुरंग पार्टे (बहुजन महा पार्टी), सुनील सखाराम तटकरे (अपक्ष), सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), घाग संजय अर्जुन (अपक्ष), गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके (भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील (अपक्ष), तटकरे सुनील पांडुरंग (अपक्ष), योगेश दीपक कदम (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) यांचा यात समावेश आहे. 16 उमेदवार असले, तरी खरी लढत शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यात होणार आहे.

मतदार

रायगड लोकसभा मतदारसंघात 16 लाख 51 हजार 560 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 8 लाख 9 हजार 344 आणि महिला 8 लाख 42 हजार 214 आणि तृतीयपंथी 3 आहेत. पेण 3 लाख 76, अलिबाग 2 लाख 92 हजार 421, श्रीवर्धन 2 लाख 56 हजार 180, महाड 2 लाख 84 हजार 230, दापोली 2 लाख 79 हजार 238, गुहागर 2 लाख 39 हजार 415 अशी मतदारांची संख्या आहे. 18 ते 19 या वयोगटातील तरुण 35 हजार 452 नवे मतदार मतदान करणार आहेत. रायगड  लोकसभा मतदारसंघात 7394 दिव्यांग असून एकूण मतदान केंद्रांपैकी 1724 मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार असणार आहेत. या दिव्यांगांमध्ये 850 अंध (क्षीण दृष्टी), 545 कर्णबधीर, मूकबधीर 276, अपंग 3737 आणि इतर दिव्यांग 1986 असे आहेत.

2179 मतदान केंद्र

मतदारसंघात एकूण 2179 मतदान केंद्र आहेत. 1996 ग्रामीण भागात तर 183 शहरी भागात आहेत. पेणमध्ये 375, अलिबाग 377, श्रीवर्धन 351, महाड 392, दापोली 363, गुहागरमध्ये 321 मतदान केंद्र आहेत. 1495 मतदान केंद्र ही रायगड जिल्ह्यातील तर उर्वरित 684 मतदान केंद्र ही रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.

मतदान यंत्रणा

मतदान केंद्रांवर 1 मतदान केंद्राध्यक्ष, 1 प्रथम मतदान अधिकारी, 2 इतर मतदान अधिकारी असे एकूण 4 मतदान अधिकारी असतील. सर्व मतदान केंद्रांसाठी 10 टक्के राखीव मतदान अधिकारी मिळून 1644 मतदान केंद्राध्यक्ष, 1644 प्रथम मतदान अधिकारी, 3284 इतर मतदान अधिकारी असे 6572 अधिकारी व कर्मचारी असतील. यामध्ये 2625 महिला आहेत. याशिवाय आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व इतर मिळून सुमारे 15 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ तालुक्यातून ने-आण करण्यासाठी 548 एसटी बसेस, 80 मिनी बसेसची व्यवस्था केली आहे. निवडणुकीसाठी पुरेशी मतदान यंत्र उपलब्ध आहेत. एकूण बॅलेट युनिट्स 5103, कंट्रोल युनिट्स 2524,  व्हीव्हीपॅट 2664 असतील. रँडमायझेशन प्रक्रिया पूर्ण झाली असून ही मतदान यंत्र ने-आण करणार्‍या वाहनांवर जीपीएसद्वारे सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जीपीएस मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला आहे. जिल्ह्यात 7 सखी मतदान केंद्र असतील. पेण नगरपालिका, अलिबाग येथील सरखेल कान्होजी आंग्रे नगर 1 आणि सरखेल कान्होजी आंग्रे नगर 2, श्रीवर्धनमधील उतेखोल 4, महाड येथील कांबळे तर्फे महाड, दापोली येथील 217 कॅम्प दापोली आणि गुहागर येथील गुहागर ही ती केंद्र असतील. या ठिकाणी महिला अधिकारी व कर्मचारी ही केंद्र चालवतील. अलिबागमधील सेंट मेरी हायस्कूल येथील मतदान केंद्र पूर्णतः दिव्यांग संचलित मतदान केंद्र असून या ठिकाणी पोलीस वगळता 5 ही अधिकारी व कर्मचारी दिव्यांग आहेत.

क्रिटीकल पोलिंग स्टेशन

पेण विधानसभा मतदारसंघातील 9 मतदान केंद्र व श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील 1 मतदान केंद्र अशी एकूण 10 मतदान केंद्र ही क्रिटीकल पोलिंग स्टेशन म्हणून निश्चित करण्यात आलेली आहेत. एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. सदर क्रिटीकल पोलिंग स्टेशनमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.

पोलीस यंत्रणा निवडणूक कामकाजासाठी एकूण 2228 पोलीस कर्मचारी व 800 गृहरक्षक दालाचे जवान नियुक्त करण्यात आलेले आहेत, तसेच मतदानाच्या दिवशी विविध कामासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, क्षेत्रिय पोलीस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस (76 कर्मचारी) व केंद्रीय राखीव पोलीस   (92 कर्मचारी)ची प्रत्येकी एक तुकडी जिल्ह्यात तैनात करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांचे पथसंचलन करण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी आज उपलब्ध होणार असून बंदोबस्त आराखड्यानुसार त्यांची विविध ठिकाणी तैनाती केली जाणार आहे. जिल्ह्यात नियुक्त क्षेत्रिय अधिकार्‍यांपैकी एकूण 23 क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या वाहनांवर बिनतारी संदेश यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यापैकी 19 वाहनांवर आतापर्यंत सदर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. दापोली तसेच गुहागर विधानसभा मतदारसंघातील एकूण 684 मतदान केंद्रांसाठी 624 पोलीस कर्मचारी व 60 होमगार्ड यांची नियुक्ती केलेली आहे. येथील 7 ठिकाणी एकूण 21 मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तैनाती करण्यात येणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply