Breaking News

एसटी कामगारांच्या आत्महत्यांना रक्तपिपासू आघाडी सरकारच जबाबदार

भाजप नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात गेल्या सहा महिन्यांत जवळपास 40 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांना राज्यातील रक्तपिपासू आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी रविवारी (दि. 14) आंदोलक एसटी कामगारांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. त्या वेळी त्यांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण, सहाव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या मागण्या मान्य करा. विलिनीकरणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा आणि एसटी कामगार जगवा, असे आवाहन शेलार यांनी केले. शासकीय कर्मचार्‍यांना जे फायदे मिळतात, ओळख मिळते ती द्या एवढीच कामगारांची मागणी आहे. यासाठी केवळ एक वाक्याचा जीआर काढायचा आहे. राज्य सरकारला सर्व सहकार्य करू, पण नाही केलेत तर आम्ही परत येतोय हे लक्षात ठेवा. ही लढाई केवळ एसटी कामगारांची नाही, तर महाराष्ट्रातील गोरगरीब, दलित, पीडित, वंचित समाजाला न्याय देण्याची आहे, असेही त्यांनी सांगितले.
आझाद मैदानासमोर मुंबई महापालिका आहे, जिथे 80 हजार कोटींचे फिक्स डिपॅाझिट आहेत, पण इथे मराठी माणूस आंदोलन करतोय त्यांना लाईट आणि पाण्याचीही सुविधा दिली जात नाही. या सत्ताधार्‍यांना लाज कशी वाटत नाही? उद्या यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
मायावी राक्षसासारखे हे सरकार शब्दांत सामान्यांना भुलवत आहे. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. काळीज नसलेले हे सरकार आहे. मंत्री म्हणतात, एसटी रक्तवाहिनी आहे. मग तुम्ही आता रक्तपिपासू का बनलात? असा सवाल करून 40 जणांचे बळी तुम्ही घेतलेत, अशी टीका त्यांनी केली.
एसटी संपादरम्यान महिला कर्मचार्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई ः गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप तीव्र बनत चालला आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने मुंबईत काही संपकरी महिला कर्मचार्‍यांनी रविवारी (दि. 14) आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलांना वेळीच रोखल्याने पुढचा अनर्थ टळला.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची या आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांची प्रमुख मागणी आहे. गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा हा संप सुरू आहे. यावर काहीच तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांची उद्विग्नता वाढत चालली आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply