खोपोली : प्रतिनिधी
त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी दंगली झाल्या, या पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील जनतेने शांतता राखावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी मंगळवारी (दि. 16) येथे केले. खोपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पवार उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. खोपोली शहरात सर्व जाती-जमातीचे लोक मिळून मिसळून राहात आहेत. शहराची शांतता राखणे ही परंपरा कायम असल्याचे दिसून येत आहे, असे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सांगितले. शहरातील शिळफाटा येथे सायंकाळी सतत होणार्या वाहतूक कोंडीबाबत अनेकांनी काही सूचना केल्या, त्यांचा विचार करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले. शहरात शांतता ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे नगराध्यक्ष सुमन अवसरमल यांनी सांगितले. खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, भाजपचे श्रीकांत पुरी, नगरसेवक मोहन औसरमल, माजी नगरसेवक व व्यापारी संघटनेचे नेते राजेंद्र पक्के, मनीष यादव, एकनाथ पिंगळे, रिचड जॉन, राजू आभनी, अतुल पाटील, रवींद्र रोकडे यांच्यासह विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते व नागरिक या बैठकीला उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper