सर्वेक्षण करण्याचे रेल्वेमंत्र्यांचे निर्देश
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्जत व पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वेस्थानकांदरम्यान शटल सेवा सुरू करण्यासाठी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शटलसाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर अडीच वर्षांपासून बंद असलेली नेरळ-माथेरान रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत सुरक्षाविषयक पाहणीही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
कर्जत व पनवेल तालुक्यातील रेल्वे प्रश्नांसंदर्भात खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी भेट घेतली. या शिष्टमंडळात आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शहराध्यक्ष प्रवीण सपकाळ, उपाध्यक्ष किरण चौधरी, नगरसेवक राकेश चौधरी, संदीप कदम, संजय भोसले, कर्जत भाजप पदाधिकारी किरण ठाकरे आदींचा समावेश होता.
कर्जत-पनवेल रेल्वेमार्गावरून सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात, मात्र शटल वा लोकल सेवा नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व चाकरमान्यांना प्रवासात अडचणी येतात. त्याचबरोबर या भागाच्या विकासालाही मर्यादा आल्या आहेत. या प्रश्नावर आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या विनंतीवरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी कर्जत व पनवेलदरम्यानच्या रेल्वे प्रश्नांबद्दल रेल्वे अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत कर्जत-पनवेल मार्गावर शटलसेवा सुरू करण्याबाबत पाहणी करण्याचे निर्देश रेल्वेमंत्र्यांनी दिले.
2019मधील मुसळधार पावसानंतर नेरळ-माथेरान रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला फटका बसला असल्याकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. या वेळी रेल्वेमंत्र्यांनी संबंधित मार्गाची लवकरात लवकर सुरक्षा तपासणी पूर्ण करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले. भविष्यात नेरळ-माथेरानदरम्यान मालवाहतुकीची ट्रेन सुरू करणे, अमन लॉज ते माथेरानदरम्यान सध्या धावणार्या तीन डब्यांच्या ट्रेनऐवजी आठ डब्यांची ट्रेन सुरू करण्याबाबत पाहणी करून तातडीने निर्णय घेण्याचे आदेशही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी अधिकार्यांना दिले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …