पनवेल ः प्रतिनिधी
रिझर्व बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार ठेवीदारांना प्रत्येकी पाच लाख रूपये परत देण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत 13 हजार 72 ठेवीदारांना 262 कोटी 65 लाख रूपये परत देण्यात आले आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्या भ्रष्ट आणि गैरकारभारामुळे बुडीत निघालेल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना केंद्र सरकारने बदलेल्या ‘डिआयसीजीसी’च्या नव्या नियमनानुसार अधिकाधिक पाच लाख रूपये देता येतात. त्यामुळे कर्नाळाच्या खातेदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कर्नाळा बँकेच्या ज्या ठेवीदारांनी अद्याप पैसे नेले नाहीत त्यांनी बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कर्नाळा बँकेचे अवसायक ए. आर. हांडे यांनी केले आहे. शनिवारी (दि. 21) मे रोजी ए ते आर या आद्याक्षरानुसार म्हणजेच अल्फाबेटिकलमधील ठेवीदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. ज्यांच्या ठेवी 50 हजार अथवा त्यापेक्षा कमी आहेत ती मंडळी पैसे घेण्यासाठी बँकेकडे फिरकलेलीही नाहीत. फारच कमी ठेवीदारांनी बँकेशी संपर्क साधला आहे. ज्यांना आपल्या कामामुळे बँकेत येण्यासाठी वेळ मिळला नसेल अशा मंडळींनीही बँकेशी संपर्क साधावा. कर्नाळा बँक 24 मेपर्यंत आद्याक्षरानुसार म्हणजेच अल्फाबेटिकल टी पर्यंतच्या ठेवीदारांचे वाटप पूर्ण करणार असल्याने अशा ठेवीदारांनी लवकरात लवकर बँकेत संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना बँकिंग बिझनेस इन इंडिया अंडर रेग्युलरेशन 22 सेक्शन, रेग्युलरेशन अॅक्ट 1949 नुसार रद्द केल्यामुळे कर्नाळा बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी पाच लाखांपर्यंतच्या ठेवी रिझर्व बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशनच्या नियमनानुसार ठेवीदारांना परत देण्यात येत आहेत. एकूण पाच लाखांपर्यंत पैस देण्यात येत असलेल्या परताव्यासाठी 374 कोटी रूपयांपैकी 13 हजार 72 ठेवीदारांना 262 कोटी 65 लाख रूपये देण्यात आले आहेत. पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेले दोन हजार 900 ठेवीदार आहेत. त्यापैकी दोन हजार 500 ठेवीदारांच्या ठेवी पाच लाखांपेक्षा कमी असून त्या दोन ते तीन लाखांदरम्यान आहेत.
बँकेत ठेवीदारांना त्यांच्या नावच्या इंग्लिश अल्फाबेटिकलप्रमाणे बोलावून पैसे दिले गेले. त्यावेळी ज्यांना येता आले नाहीत त्या ए ते आर अल्फाबेटिकलमधील ठेवीदारांसाठी शनिवारी (दि. 21) खास सोय करण्यात आली आहे. त्या दिवशी त्यांनी बँकेत येऊन कागदपत्रे दाखल करावीत.
– ए. आर. हांडे, अवसायक, कर्नाळा बँक
RamPrahar – The Panvel Daily Paper