Breaking News

पनवेल संघाचा अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश

पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत पार्थ पवारची दमदार फलंदाजी

अलिबाग ः प्रतिनिधी

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाने एजे स्पोर्ट्स असोसिएशन कळंबोली संघाचा पराभव करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आता उरण तालुक्यातील भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघाबरोबर त्यांची अंतिम लढत होणार आहे. पनवेल संघाचा मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज पार्थ पवार व आराध्य पाटील यांच्या झुंझार खेळाच्या जोरावर संघाने तीन गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या कळंबोली संघाने 40 षटकांच्या समाप्तीनंतर सर्व गडी गमावत 168 धावा फलकावर लावल्या होत्या. कळंबोलीच्या आयुष्य महेताने 57 धावांची खेळी केली, तर प्रणित उलवेकरने 21 धावा केल्या. पनवेल संघाकडून ईशान पाठक याने चार, तर अथर्व पाटीलने दोन बळी घेतले.प्रत्युत्तरात पनवेल संघाने नऊ गडी गमावत 169 धावांचे लक्ष पूर्ण केले. मधल्या फळीतील फलंदाज पार्थ पवार याने दमदार फलंदाजी करीत 85 चेंडूंत 14 चौकारांच्या साहाय्याने 89 धावा केल्या त्याला आराध्य पाटीलने सुरेख साथ देत 28 धावा काढल्या. कळंबोलीकडून श्लोक साळुंके व आयुष्य महेता यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. दमदार फलंदाजी करणार्‍या पार्थला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला कळंबोलीचा संघ. या संघाला व प्रत्येक खेळाडूला प्रसाद अनंत राऊत (पोयनाड) यांच्याकडून आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमास झुंझार युवक मंडळाचे सचिव किशोर तावडे, दीपक साळवी, अजय टेमकर, सुजित साळवी, अजित पाटील, प्रतिक मोहिते, मंगेश पवार, अ‍ॅड. पंकज पंडित, संकेश ढोळे, आदेश नाईक उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply