कर्जत : बातमीदार
कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत होते. 15 जूनपासून बहुतांश शाळा सुरू होणार असल्याने गणवेश खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थी कर्जत व नेरळमधील दुकानांत गर्दी करीत आहेत. दोन वर्षांनंतर लहान मुले प्रत्यक्ष शाळेत जात असल्याने गणवेश खरेदीसाठी अनेक दुकानांमध्ये गर्दी दिसत होती. तालुक्यातील कर्जत आणि नेरळ येथील मोठ्या बाजारपेठांतील कपड्यांची आणि पुस्तकांची दुकाने पालकांच्या गर्दीने फुल्ल झाली आहेत. प्रत्येक शाळेचा वेगवेगळा गणवेश असल्याने आणि कोणत्या शाळेचा कोणता गणवेश आहे? हे पूर्णपणे माहीत नाही. त्यामुळे दुकानदारांनाही मोठा प्रश्न पडत आहे. तसेच असे असले तरी पालक आणि विद्यार्थ्यांत उत्साह असल्याने दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. गणवेश, पुस्तकांसह विद्यार्थ्यांना पावसाळी चपला तसेच लहान मुलांसाठी रेनकोट, मोठ्या मुलांना छत्र्या यांचीसुद्धा गरज भासत आहे. नवीन दफ्तरेदेखील खरेदी करण्याची वेळ पालकांवर आली असून त्यासाठी डीमार्ट सारख्या दुकानातही गर्दी झालेली दिसून येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper