मंदिरात फुलांची सजावट व आकर्षक रोषणाई
पाली : प्रतिनिधी
अंगारकी चतुर्थीनिमित्त बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी (दि. 13) पालीत भाविकांची गर्दी उसळली होती. श्री. बल्लाळेश्वराची मूर्ती फुलांनी सजवली होती तर मंदिर व परिसरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अष्टविनायकांपैकी पाली हे एक प्रख्यात धार्मिक स्थळ आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी येथील बल्लाळेश्वर मंदिर भाविक, भक्तगणांनी फुलून निघाले होते. गणेशोत्सवाचे वातावरण असल्याने बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रायगड जिल्ह्यासह मुबंई, ठाणे, पुणे आदी परिसरातील भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने पालीत दाखल झाले होते. गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदा तेजीत होता. मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. मात्र पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. पोलीस निरीक्षक विश्वजित काईनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper