लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी व परिसरातील पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी)चे कार्यकारी अभियंता के.बी.पाटील यांनी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे.
पनवेल परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने एमजेपीचे कार्यकारी अभियंता के.बी.पाटील यांच्यासोबत शुक्रवारी (दि.22) सविस्तर चर्चा केली. या वेळी पाटील यांनी नागरिकांना मुबलक पाणी कसे उपलब्ध करून देण्यात येईल याबाबतचे नियोजन सुरू असून लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
भाजपच्या शिष्टमंडळात उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, अॅड. मनोज भुजबळ तसेच भीमराव पोवार, मोतीलाल मोळी, शिवाजी भगत, युवा मोर्चाचे अक्षय सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता.