साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट. एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातील चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार उषा चव्हाण यांना जाहीर झाला आणि उषा चव्हाण यांच्या अतिशय मेहनती, यशस्वी वाटचालीचा हा गौरव आहे असे मला मनोमन वाटले.
सध्या उषा चव्हाण पुणे शहरात राहताहेत आणि त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले आहे. त्यामुळेच त्या वरळीतील डोम थिएटरमध्ये अतिशय शानदारपणे रंगलेल्या चित्रपट महोत्सवाला हजर राहिल्या नाहीत. त्यांच्या वतीने निर्माता, दिग्दर्शक व वितरक विजय कोंडके यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
उषा चव्हाण यांच्या भेटीचे मला योग आले. एक आठवणीत राहिलेला योग दादा कोंडके अभिनित व दिग्दर्शित पळवा पळवा (1990) या चित्रपटाच्या कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओतील चित्रीकरणाच्या वेळचा. या चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टिंगसाठीचा मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांचा हा दौरा होता. उषा चव्हाण अगदी रोखठोक बोलणार्या. याच वेळेस त्यांच्याशी विशेष संवाद साधण्याची संधी मिळाली असता त्यांनी सांगितलेली एक विशेष गोष्ट,
मुख्य नायिकेच्या अवतीभवतीची छोटीशी भूमिका अथवा नृत्यात सहभाग घेत आपली रूपेरी पडद्यावरील प्रवास सुरू करून मग मुख्य नायिकेची संधी मिळाली असे अनेक अभिनेत्रींबद्दल झालेय/होत असते, पण त्यात एकादी मजेशीर गोष्टही घडते. उषा चव्हाणबद्दल तशीच गोष्ट घडली. त्यांनी अनंत माने दिग्दर्शित ’सवाल माझा ऐका’ या चित्रपटात जयश्री गडकर यांच्या बाजूला लावणी नृत्यात सहभाग घेतला, पण त्यांचा तो सहभाग लक्षवेधक होता. त्यावेळी त्यांना दिवसाला पंधरा रुपये मानधन मिळत असे. 1964 साली ही रक्कम बरीच समाधानकारक होती. त्यानंतर अनंत माने यांनी ’केला इशारा जाता जाता’ या चित्रपटाबाबत त्यांच्याशी बोलणे सुरु करताच त्या म्हणाल्या, आता मला दिवसा वीस रुपये असं मानधन हवे. अनंत माने म्हणाले, यावेळी जास्त मानधन मिळेल, कारण या चित्रपटात तू नायिका आहेस. उषा चव्हाण यांनी ग्रुपमध्ये नृत्यात चमक दाखवली हे एखाद्या दिग्दर्शकाने हेरणे आणि अशी नायिकेची संधी देणे हेच विशेष होय.
अशीच आणखी एक गोष्ट, चित्रपटाच्या जगात यश हेच सर्वात मोठे चलनी नाणे हे सर्वकालीन मोठे सत्य आहे, पण यशाचे सातत्य टिकवून राहणेही आवश्यक आहे. उषा चव्हाण नायिका असलेला ’केला इशारा जाता जाता’ हा पहिलाच चित्रपट ज्युबिली हिट ठरल्याने साहजिकच आणखी काही मराठी चित्रपटात भूमिका मिळाल्या. खंडोबाची आण, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, मला तुमची म्हणा हे उषा चव्हाण नायिका असलेले चित्रपट अपयशी ठरल्याने पुढची वाटचाल अवघड होती. अशातच दादा कोंडके यांच्या ’सोंगाड्या’ या चित्रपटासाठी जयश्री गडकर इत्यादी अभिनेत्रींनी नकार दिला, म्हणून उषा चव्हाणची दादा कोंडके यांनी निवड केली आणि हा चित्रपट असा काही सुपर हिट ठरला की दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुपर हिट जोडी ठरली. सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या, आली अंगावर, मुका घ्या मुका, पळवा पळवी, सासरचं धोतर, वाजवू का या मराठी आणि तेरे मेरे बीच मे, अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे’ या हिंदी अशा एकूण बारा चित्रपटात ही जोडी एकत्र आल्याचा विक्रम घडला. ही गोष्ट इतक्यावरच थांबत नाही, बोट लावीन तेथे गुदगुल्या या चित्रपटातील लोकप्रिय गाणे ढगाला लागली कळ या नावाचा चित्रपट निर्माण झाला त्यात उषा चव्हाण नायिका होती. यश हे असे असते. ते साथ देते तेव्हा दूरवर देते.
सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत जे स्थान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीला होते, अगदी तेच स्थान मराठी चित्रपटात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांना होते. पडद्यावर उत्तम जमलेल्या या केमिस्ट्रीला त्यांचे चाहते प्रत्यक्षातही एखाद्या सोहळ्यास एकत्र पाहण्यास विशेष उत्सुक असत. दोघांपैकी एक जरी कोणी नसले तरी एखादा चाहता त्याबाबत अगदी बेधडकपणे प्रश्न करी आणि त्याचाच मग होणारा किस्सा बराच काळ चघळला जाई. असं असलं तरीही उषा चव्हाणला स्वतःचं व्यक्तिमत्व, शैली आणि ओळख आहे. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1950 रोजीचा कोल्हापुरातील. म्हणजेच त्यांनी वयाची पंचाहत्तरीत प्रवेश केला आहे.
उषा दत्तात्रय चव्हाण असे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी चित्र-नाट्यसृष्टीत प्रवेश केला तो केवळ गरजेपोटी. घरची अत्यंत गरीबी म्हणून त्यांनी शाळा सोडली. त्या फक्त सातवी इयत्ता शिकल्या आहेत. खरंतर शाळेत असताना त्या हुशार आणि कर्तव्यदक्ष होत्या. शाळेतील क्रीडा स्पर्धेत आवर्जून भाग घेत. हुतुतू, खो खो, लंगडी आदी मर्दानी खेळात त्यांनी चांगलेच प्राविण्य मिळवल्याने त्या शाळेच्या संघाच्या आधारस्तंभ ठरल्या. त्याच वयात त्यांना नृत्याची आवड लागली, पण नृत्याचे रितसर प्रशिक्षण घेणे शक्य नसल्याने स्वतःचा सराव, निरीक्षण आणि विलक्षण जिद्द. या जोरावर त्या लोकनृत्यासह शास्त्रीय नृत्यही शिकल्या आणि हाच त्यांचा गुण त्यांना संपूर्ण कारकिर्दीत महत्वाचा ठरला. नृत्यासह त्यांना अभिनयातही गती होती. आपल्या या गोष्टी त्यांनी खूप मेहनतीने विकसित केल्या.
हळूहळू त्यांनी मेळे, नाटके यातून कामे करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याना एका वेळी पंधरा, वीस रुपये मिळत, ते पैसे घरासाठी उपयोगी ठरत. त्याच वेळेस त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकले. ’आज दुपारी फोडली सुपारी’, ’बेलभंडार’, ’लवंगी मिरची कोल्हापूरची’ या लोकनाट्यात त्यांनी भूमिका साकारताना ग्रामीण भागात दौरे केले.
असे सुरू असतानाच मराठी चित्रपटात समूह नृत्यात (म्हणजे नायिकेच्या मागे अथवा आजूबाजूला) भाग घेण्यासाठी त्यानी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि हा चित्रपट होता, अनंत माने दिग्दर्शित ’केला इशारा जाता जाता’. त्या लावणीप्रधान चित्रपटात जयश्री गडकर यांच्या मागे स्टेजवर ग्रुपमध्ये नाचत उषा चव्हाण यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले, पण तेच पाऊल मग खूप मेहनतीने त्यांनी योग्य असल्याचे कालांतराने सिद्ध केले. त्याच वेळेस त्यांना ’सवाल माझा ऐका’ या चित्रपटातही भूमिका मिळाली. 1964 सालचा हा चित्रपट आहे.
उषा चव्हाण यांना खणखणीत यश मिळाले ते दादा कोंडके यांच्या ’सोंगाड्या’ (1971) या चित्रपटापासून! दादा कोंडके युगही याच चित्रपटाने सुरू झाले. या चित्रपटाच्या तडाखेबाज यश उषा चव्हाण यांना मराठी चित्रपटाची नृत्यनिपुण अभिनेत्री अशी ओळख मिळवून देणारे ठरले. या चित्रपटापासून दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही सुपर हिट जोडी जमली. प्रेक्षकांनी या जोडीला शब्दशः डोक्यावर घेतले. या जोडीचे हे सगळे चित्रपट खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादण्यात यशस्वी ठरले. भालजी पेंढारकर दिग्दर्शित ’गनिमी कावा’ या चित्रपटाही ही जोडी होती. दिग्दर्शक मनमोहन देसाईनी या जोडीने आपल्या ’कुली’ या चित्रपटात एकत्र नृत्य साकारावे यासाठी बरेच प्रयत्न केल्याची तेव्हा बरीच चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही.
आपल्या या यशस्वी कारकिर्दीत उषा चव्हाण यांना काही मानाचे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 17व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात 1978 साली त्यांना ’बोट लावीन तिथं गुदगुल्या’ या चित्रपटातील मैना रुकडीकर या भूमिकेसाठी तो मिळाला. दादा कोंडके यांच्या चित्रपटातील अभिनयासाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला हे विशेष उल्लेखनीय आहे. उषा चव्हाण यांच्या काही भूमिकांचा विशेष उल्लेख करायला हवाच. दिनकर द पाटील दिग्दर्शित ’सूनबाई ओटी भरून जा’ (1979) आणि अरुण कर्नाटकी दिग्दर्शित ’रानपाखरं’ (1980). यापैकी सूनबाई ओटी भरुन जा या चित्रपटात त्यांनी स्रीची विविध रूपे साकारलीत. ही खूपच आव्हानात्मक व्यक्तिरेखा होती. या व्यक्तीरेखेचे नाव चंपा. खूनाचा आळ पचवून आणि दमेपर्यंत पायात चाळ बांधून ती आपल्या मुलाला बॅरिस्टर करते. तर ’रानपाखरं’ याहीपेक्षा वेगळी भूमिका. कुटुंबासाठी तमाशाचा फड चालवणारी लीला कालांतराने वयपरत्वे थकते. ती आतून तुटली आहे. तिला जिद्ददेखील सोडून गेली आहे. डोळे पार खोल गेलेत. धानोरीच्या एस. टी. स्टँडवर पुढ्यात पेटी घेऊन गात आहे आणि दुर्दैवाने गाता गाताच तिथेच तिची प्राणजोत मालवते. शरद पिळगावकर निर्मित आणि मुरलीधर कापडी दिग्दर्शित ’चोरावर मोर’ (1980) हा तसा रमेश सिप्पी दिग्दर्शित ’सीता और गीता’ (1972) या चित्रपटाची रिमेक. मूळ चित्रपटात हेमा मालिनीने जबरदस्त दुहेरी भूमिका साकारली. उषा चव्हाण यांनीही भिन्न स्वभावाच्या शांता आणि दुर्गा या जुळ्या बहिणी साकारत धमाल उडवली. कडकलक्ष्मी, नाव मोठे लक्षण खोटे, मंत्र्यांची सून, भामटा, जिद्द, सख्या सजना अशा अनेक मराठी चित्रपटात त्यानी विविध प्रकारच्या साकारल्या. एकीकडे दादा कोंडके यांच्या चित्रपटांची हुकमी नायिका (अधेमधे त्यांचे दादांशी बिनसायचे तेव्हा इतर कोणी अभिनेत्री त्यांच्या चित्रपटात असे) आणि इतर निर्माता आणि दिग्दर्शकांच्या चित्रपटातून मोठ्या प्रमाणात भूमिका असा एक छान समतोल उषा चव्हाण यांनी राखला. ग्रामीण मराठी चित्रपटातही उत्तम कथासूत्र नक्कीच असते हे या चित्रपटांनी सिद्ध केले.
अशा वाटचालीत उषा चव्हाण यांनी आपल्या ’अभिनय चित्र’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली आणि 1988 साली त्यांनी कथा, पटकथा, संवाद गीते, निर्माती, दिग्दर्शिका आणि मुख्य नायिका अशी जबाबदारी उचलून ’गौराचा नवरा’ हा चित्रपट निर्माण केला. त्यात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, कुलदीप पवार, शरद तळवळकर, वसंत शिंदे इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यानंतर 1992 साली पुन्हा अशीच अष्टपैलू कामगिरी करत ’धरपकड’ हा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटात अशोक सराफ, निळू फुले, श्रीकांत मोघे, राम नगरकर इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय ’शिरडी के साईबाबा’ या चित्रपटात त्यांनी एक नृत्य साकारले. उषा चव्हाण यांनी पडद्यावर अनेक तरी सुपर हिट गाणी साकारलीत. राया चला घोड्यावरती बसू, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी, काय गं सखू , बिब घ्या बिब शिकेकाई (सोंगाड्या), काल रातीला सपान पडलं (एकटा जीव सदाशिव), सख्या सजना नका तुम्ही जाऊ, मी न्हाई यायची शिणुमाला (सख्या सजना), एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापूरी साज (सोनारानं टोचलं कान), अंगात डगला कमरेला पट्टा, अहो हवालदार माझ्या कुलुपाची चावी हरवली, बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभलं का? (पांडू हवालदार), बाई माझ्या बकरीचा लागला लळा, गंगू तारुण्य तुझं बेफान जसा इष्काचा अॅटमबॉम्ब (राम राम गंगाराम), काल दुपारी फुटली सुपारी (नवरा माझा ब्रह्मचारी), लपवू नका छपवू नका (बोट लावीन तिथं गुदगुल्या) या गाण्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रियता संपादली. ग्रामीण भागातील टूरिंग टॉकीजमधील त्यांच्या चित्रपटांची लोकप्रियता व लाऊडस्पीकरवरील गाणी ही उल्लेखनीय गोष्ट.
उषा चव्हाण यांच्या आणखीन काही उल्लेखनीय चित्रपटात भैरु पैलवान की जय, नवरा माझा ब्रह्मचारी, चोरीचा मामला, पैज, चांडाळ चौकडी अशा अनेक मराठी चित्रपटात भूमिका साकारली. शिरडी के साईबाबा या चित्रपटातही त्यांनी गाणे सादर केले. सत्तर व ऐंशीच्या दशकात त्यांची उल्लेखनीय वाटचाल होती.
उषा चव्हाण यांना प्रवासाची खूप आवड. आपल्या मराठी चित्रपटांच्या शूटिंगच्या निमित्ताने तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा असे फिरणे होईच. त्याशिवाय आपल्या चित्रपटांच्या प्रीमियरसाठी नाशिकपासून इचलकरंजीपर्यंत फिरणे होईच. ’तेरे मेरे बीच मे’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यासाठी हैदराबादला जाणे झाले. उषा चव्हाण यांना घरकामाची आणि बागकामाचीही खूप आवड. पुण्यातील आपल्या ’अभिनय’ बंगल्यावर त्याचा पूर्वी नेहमीच प्रत्यय येई. देवभूजेला प्राधान्य देणे, उपास तपास करणे गरजेचे मानले. खाण्या-पिण्याची विशेष शौकिन नाही, पण पूर्वी झुणका भाकर आवडीने खात.
उषा चव्हाण यांच्याबाबतीत एक अगदी वेगळी आठवण म्हणजे, एकदा त्या शिवतीर्थावरील शिवसेना मेळाव्यात दादा कोंडके यांच्यासोबत आल्या असताना त्यांनी त्या प्रचंड मेळाव्यात जोरदार भाषण करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ही वृत्तपत्रातील चौकटीची बातमी झाली.
कालांतराने उषा चव्हाण यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आता त्या पुणे शहरात आपल्या कुटुंबासह राहतात.
उषा चव्हाण या केवळ एक अष्टपैलू अभिनेत्री नसून एक उत्तम नर्तक आणि गायिका देखील आहेत. ’मुक्काम पोस्ट ढेबेवाडी..’ या चित्रपटातील हिरव्या माडीचा जिना अवघडत्यांनी गायलेले गाणे लोकप्रिय झाले होते. उषा चव्हाण यांनी तेलुगू चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. ज्ञात ’दुर्दबीट्टा’ या तेलगू चित्रपटात त्यांनी दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता राजकुमारसोबत काम केले. दादा कोंडके यांनी त्यांच्या खडकवासला येथील स्टुडिओच्या पाच ट्रस्टीपैकी एक म्हणून उषा चव्हाण यांचे नाव मृत्यूपत्रात लिहीले होते. या स्टुडिओच्या भव्य दिमाखदार उदघाटन सोहळ्यास मुंबईतील आम्हा चित्रपट पत्रकारांचा खास दौरा आयोजित केला होता. उषा चव्हाण यांचे लग्न दत्तात्रय कडू देशमुख यांच्याशी झाले होते. ते पुण्यातील जमीनदार होते. हृदयनाथ कडू देशमुख असे या जोडप्यास एक मुलगा आहे. उषा चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. चित्रपट क्षेत्रातील दीर्घकालीन वाटचालीतील हा एक वेगळा टप्पा. -दिलीप ठाकूर चित्रपट समीक्षक
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper