आपल्या देशातील चित्रपटसृष्टीत आपल्या महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीचे स्थान अतिशय गौरवास्पद आणि विशेष उल्लेखनीय. याच आपल्या चित्रपटसृष्टीतील मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी अनेक गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण. याच चित्रनगरीला 26 सप्टेंबर रोजी अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली असून आता अतिशय दमदारपणे या चित्रनगरीची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे.
’सिनेमात जायचं, तर मुंबई गाठायला हवी’ ही दीर्घकालीन सर्वसाधारण भावना आणि ती स्वाभाविक आहे. खरंतर आपल्या चित्रपटसृष्टीला नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात बॉलीवूड म्हणणे सुरू झाले ते कार्पोरेट पिढीचे देणे. हॉलिवूडच्या धर्तीवर बॉलीवूड म्हणणे चुकीचे आहे. आणि आपल्या देशात मराठी, हिंदीसह लहान मोठ्या अशा दोन डझन प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मिती होते आणि त्यातही ’चित्रपटाचा स्टुडिओ’ ही जगभरातील चित्रपट रसिकांचा विलक्षण कुतूहलाची गोष्ट. चित्रपट संस्कृतीतील असे चित्रीकरणासाठीचे स्टुडिओ व प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचतो ती चित्रपटगृह हा एक मोठाच प्रवास आहे.
याभोवती अनेक लहान मोठ्या गोष्टी गुंतल्यात, गुंफल्यात, विणल्यात, घडताहेत. ’शूटिंग कसे असते’ याचं कुतूहल आणि ’स्टार कसे दिसतात’ याची ओढ. सर्वसामान्य माणसाला चित्रपट विश्वाबद्दल कायमच विलक्षण कुतूहल व कौतुक. हा कधीचं न संपणारा असा भरपूर माहितीपूर्ण आणि मनोरंजक विषय.
याच बहुस्तरीय गोष्टीतील एक स्थळ, महाराष्ट्र राज्य शासनाची गोरेगाव पूर्व येथे असलेली तब्बल 520 एकर जमीनीवरील प्रशस्त अशी दादासाहेब फाळके चित्रनगरी. मुंबईच्या वैभवातील एक मानाचे स्थान.
चित्रपट तर झालेच पण अगदी मालिका/रिअॅलिटी शो/गेम शो/कौन बनेगा करोडपती/जाहिराती/व्हिडीओ अल्बम/वेबसिरिज/फोटो सेशन/ओटीटी कन्टेन यांच्या निर्मितीचे एक हक्काचे स्थान.
मी मीडियात 1982 साली पाऊल टाकले आणि कायमच प्रत्यक्षातील चित्रपटसृष्टीत भटकंती, लहान मोठ्या भेटीगाठी व निरीक्षण यावर फोकस कायम ठेवला. पहिल्यांदा मी या चित्रनगरीत 1983 साली भेट दिली. सुहास खडके अभिनित व दिग्दर्शित दोजख या चित्रपटाचे या चित्रनगरीत चित्रीकरण असताना सुहास खांडके यांच्या आमंत्रणावरून मी सर्वप्रथम या चित्रनगरीत पाऊल टाकले. त्या दिवशी अनुपम खेर आणि पल्लवी यांच्यावर काही दृश्ये चित्रित करण्यात आली. मी गिरणगावात लहानाचा मोठा ह़ोताना सिंगल स्क्रीन थिएटर अर्थात एकपडदा चित्रपटगृह (त्यात अनेकदा पडद्याजवळच्या पहिल्या चार रांगेतील स्टॉलचा हुकमी प्रेक्षक. हमखास टाळ्या शिट्यानी थिएटर डोक्यावर घेणार), गल्ली चित्रपट, मुंबई दूरदर्शनवर शनिवार संध्याकाळी मराठी चित्रपट आणि रविवार संध्याकाळी हिंदी चित्रपट पाहून मोठा झालेलो. मला आयुष्यात पहिल्यांदाच चित्रनगरीत पाऊल टाकण्यावर किती आणि केवढा आनंद झाला असेल याचा विचार करा. तेव्हापासून अगणित वेळा या चित्रनगरीत विविध कारणास्तव जातो आहे. त्यामुळे या चित्रनगरीबद्दल माझ्या आठवणी अनेक आणि त्यात केवढे तरी रंग. चित्रपटाच्या जगात फिरताना मी कधीच कंटाळा केला नाही. म्हणूनच मला पुस्तकाबाहेरचे व गुगलबाहेरचे मराठी व हिंदी चित्रपटाचे जग खोलवर माहीत आहे.
या चित्रनगरीत डोकावताना थोडसं फ्लॅशबॅकमध्ये…
दादासाहेब फाळके यांनी आपल्याकडचा पहिला चित्रपट ’राजा हरिश्चंद्र’ निर्माण केला तो 3 मे 1913 रोजी गिरगावातील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तो मूकपट आहे आणि तेव्हापासून आपल्याकडे मूकपटाची निर्मिती सुरु झाली. विशेष म्हणजे, ’राजा हरिश्चंद्र’साठी दादासाहेब फाळके यांनी दादरला पूर्व बाजूच्या मथुरा भवनमध्ये या चित्रपटाच्या निर्मीतीसाठी स्टुडिओ उभारला. तेथे त्यांनी तब्बल आठ महिने शूटिंग करीत हा चित्रपट पूर्ण केला. यामुळे मुंबईत मूकपटाची निर्मिती सुरु झाली. सुरुवातीच्या काळात असेच पौराणिक मूकपट निर्माण होत. मग नाशिक शहरात फाळके यांच्या कंपनीने मूकपट निर्मिती सुरू केली. पुणे शहरात पाटणकर फ्रेन्डस अॅण्ड कंपनीने संतपट निर्मिती सुरू केली. कोल्हापूरला प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. असे करता करता निर्मिती संस्था आणि शहरे वाढत गेली आणि त्यात मुंबईचे महत्त्व कायम राहिले. प्रभात फिल्म कंपनीनेच व्ही. शांताराम दिग्दर्शित ’अयोध्येचा राजा’ या आपल्या पहिल्या मराठी बोलपटाची निर्मिती केली. 1932 सालची ही गोष्ट आहे. 6 फेब्रुवारी 1932 रोजी हा बोलपट गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तत्पूर्वी अर्देशिर इराणी यांनी ’आलम आरा’ हा पहिला हिंदी बोलपट मुंबईत निर्माण केला. तो 14 मार्च 1931 रोजी गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्येच प्रदर्शित झाला. त्याची निर्मिती ग्रँड रोड परिसरातील ज्योती स्टुडिओत झाली. आता चित्रपट बोलू लागला. मूकपटाचा काळ आता मागे पडू लागला आणि बोलपटाचे युग हळूहळू आकार घेऊ लागले. देशाच्या इतर भागातही हळूहळू स्थानिक प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मिती होऊ लागली. त्या काळात मुंबई, पुणे, कोल्हापूर, मद्रास (आताचे चैन्नई), लाहोर (आता पाकिस्तानात), कलकत्ता (आताचे कोलकत्ता) ही चित्रपट निर्मितीची मुख्य केंद्र होती. हे माध्यम व व्यवसाय हळूहळू आकार घेत होतो. मद्रासला दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची तर कोलकत्ता येथे बंगाली चित्रपटाची निर्मिती होई. मुंबई आणि लाहोर येथे हिंदी तर पुणे आणि कोल्हापूर येथे मराठी चित्रपटांची निर्मिती होई. फाळणीनंतर लाहोर पाकिस्तानला गेले. फाळणीच्या वेळी दोन्हीकडील अनेक हिंदी चित्रपट अर्धवटही राहिले. हाही एक विषय आहे.
आपण प्रामुख्याने मुंबईचा विचार करू. मुंबईत एकेक करत स्टुडिओ उभे राहत होते आणि चित्रपट निर्मितीची वाढ होत गेली. ती होताना देशाच्या विविध भागातून कलाकार, लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कामगार मुंबईत येऊ लागले, कारण येथे संधी होती. हे माध्यम व व्यवसाय येथे मूळ धरत होते. त्याची वाढ होत होती. तीसच्या दशकात प्रभात (पुणे शहरात), न्यू थिएटर्स (कोलकत्ता) आणि बॉम्बे टॉकीज (मुंबईत) चित्रपट निर्मितीचा पाया रुजवला. बॉम्बे टॉकीजचा जन्म 1936 सालचा मुंबईतीलच. चित्रपती व्ही. शांताराम यांनी 1943 साली मुंबईत परेल येथे राजकमल कलामंदिर स्टुडिओची स्थापना केली. या स्टुडिओत शूटिंगपासून डबिंग, मिक्सिंग, रेकॉर्डिंग वगैरे सगळं करून तयार चित्रपट करून बाहेर यायचे अशी सुविधा. त्या काळात ’चित्रपट स्टुडिओ’ची ओळख
अशीच होती.
मुंबईत एकेक करत स्टुडिओ उभे राहत जाताना एक गोष्ट झाल्याचे दिसते, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी आपला स्वतःचा स्टुडिओ असावा असा जास्त कल राहिला. त्या काळाशी ते सुसंगत होते. काही उदाहरणे सांगायची, तर राज कपूरने 1948 साली चेंबुरला आर.के. स्टुडिओची स्थापना केली. कमाल अमरोही यांनी अंधेरीच्या महाकाली परिसरात भव्य कमालीस्थान स्टुडिओ उभारला. शशधर मुखर्जी यांनी अगोदर गोरेगावला फिल्मीस्थान तर अंधेरी पश्चिमेला आंबोली येथे फिल्मालय स्टुडिओ उभारला. मेहबूब खान यांनी वांद्य्राला मेहबूब स्टुडिओ उभारला. रामानंद सागर, शक्ती सामंता, प्रमोद चक्रवर्ती, एफ.सी. मेहरा आणि आत्माराम या पाच निर्मात्यांनी अंधेरी कुर्ला रोडवर नटराज स्टुडिओ उभारला. दादरला चंदुलाल शहा यांचाच रणजित स्टुडिओ, साकी नाकाजवळ हेमंत कदम या मराठी माणसाने चांदिवली स्टुडिओ उभारला. गुलशन रॉय यांचा त्रिमूर्ती स्टुडिओ दहिसर येथे सुरु झाला. या वाटचालीत मुंबईत आणखी काही चित्रपट शूटिंग स्टुडिओची संख्या वाढली
म्हणजेच मुंबईत चित्रपटसृष्टी खोल खोल रूजत गेली.त्यात आघाडीच्या निर्मिती संस्था मुंबईत होत्या. काही आदरयुक्त नावे सांगायची तर व्ही. शांताराम यांची राजकमल फिल्म, राज कपूरची आर.के. फिल्म, बिमल रॉय यांचे बिमल रॉय प्रॉडक्सन्स, आनंद बंधूंचे नवकेतन, त्यातीलच मग चेतन आनंदचे हिमालय फिल्म, बी.आर. चोप्रा यांची बी.आर. फिल्म, सोहराब मोदींचे मिनर्व्हा मुव्हीटोन तसेच मेहबूब खान, कमाल अमरोही, के. असिफ, रामानंद सागर याचे सागर आर्टस अशा अनेक निर्मात्यांनी मुंबईत सातत्याने चित्रपट निर्मिती केली. आज पाहिलं तर मुंबईतील अनेक जुने चित्रपट स्टुडिओ, सिंगल स्क्रीन थिएटर्स, चित्रीकरणाचे बंगले आणि जुन्या काळातील कलाकारांचे बंगलेही इतिहासजमा झाले आहेत.
आणि या सगळ्यात महत्त्वाचे आहे ते आपली दादासाहेब फाळके चित्रनगरी. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुढाकारातून ही भव्य चित्रनगरी उभी राहिली. 1977 साली ती कार्यरत झाली. चित्रपटसृष्टीच्या वतीने चित्रपती व्ही. शांताराम यांनी यासाठी प्रतिनिधित्व केले. एकूण 520 एकर जमीनीवर अतिशय विस्तीर्ण आणि अनेक प्रकारचे शूटिंग ’स्पॉट’ असलेली ही एक प्रकारची संस्थाच. बोरीवलीतीच्या बाजूने पाह्यचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दुसरीकडे पहायचे ते गोरेगावचे आरेचे विशाल जंगल. या दोन्हीच्या दरम्यान ही वैशिष्ट्यपूर्ण चित्रनगरी. आज या चित्रनगरीला भेट देण्यासाठी देशभरातील पर्यटकांची वर्दळ वाढली आहे आणि ते स्वाभाविक आहे. मुंबई पाहायला जायचयं आणि मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी यापासून अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्या बंगल्यासह चित्रनगरी पहायला हवीच. आपल्या देशात चित्रपट आणि क्रिकेट यांचे समाजातील विविध स्तरांवर वेड आहे, त्यात चित्रीकरणाचा स्टुडिओ व क्रिकेटचे स्टेडियम पाहण्याची विलक्षण ओढ आहे. चित्रपट व क्रिकेट हा अनेकांच्या जगण्यातील आनंद आहे.
चित्रनगरीचा आजपर्यंतचा प्रवास बहुस्तरीय, असंख्य आठवणी, गोष्टी, घटना, किस्से, कथा, दंतकथा, बातम्या असणारा असा आहे. चित्रनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते हेलिपॅडपर्यंत आणि मिनी थिएटरपासून गार्डनपर्यंत असा हा बहुरंगी, बहुढंगी असा हा प्रवास आहे. काही वर्षांपूर्वी मिनी थिएटर पाडले गेले आहे. याच मिनी थिएटरमध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम, कमल हसन दिग्दर्शित हे राम, राकेश रोशन दिग्दर्शित कहो ना प्यार है, करण जोहर दिग्दर्शित माय नेम इज खान अशा अनेक चित्रपटाचे आम्हा चित्रपट समीक्षांसाठीचे खेळ आयोजित करण्यात आले होते. ही विशेष आठवण.
यश चोप्रा दिग्दर्शित ‘परंपरा’, सुभाष घई दिग्दर्शित ’कर्मा’पासून एन. चंद्रा दिग्दर्शित हमला. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ’हम दिल दे चुके सनम’पर्यंत आणि डॉ . जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’, गिरीश घाणेकर दिग्दर्शित ’रंगत संगत ’पासून रमेश देव दिग्दर्शित ‘जीवा सखा’, श्रावणी देवधर दिग्दर्शित ’सरकारमाना’पर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे शूटिंग याच चित्रनगरीत झाले.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या 48व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महामंडळाच्या 48व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चित्रपताका या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. महामंडळाच्या विविध योजना, सेवा, उपक्रम यांची माहिती देण्यासाठी तसेच चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडीची दखल घेण्याच्या उद्देशाने महामंडळाकडून चित्रपताका या त्रैमासिकाची सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात या त्रैमासिकाच्या शुभारंभाच्या अंकाचे प्रकाशन झाले.
आपल्या चित्रनगरीचा प्रवास चौफेर व वैशिष्ट्यपूर्ण. आणखी दोन वर्षांनी पन्नास वर्षे अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या महाराष्ट्रासाठी ही गौरवास्पद अशीच वाटचाल आहे.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समिक्षक
RamPrahar – The Panvel Daily Paper