रसायनी : रामप्रहर वृत्त
दुर्गम भागामध्ये सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य असून नागरिकांच्या समस्या सोडवणे ही आमच्यासाठी विकासकामांची मोठी संधी आहे. या संधीचे आम्ही निश्चितच सोने करू, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी आपटा घेरावाडी येथे बोअरवेल आणि सोलर पंपाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.
पनवेल तालुक्यातील आपटा येथील दुर्गम अशा घेरावाडीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच पंचायत समिती सभापती रंजना वास्कर यांच्या पुढाकाराने बोअरवेल आणि सोलर पंप उभारण्यात आला आहे. या विकासकामाचे लोकार्पण सभापती रंजना वास्कर यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी व भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.२) झाले.
पनवेल पंचायत समितीच्या सेस फंडातून हे काम पूर्ण करण्यात आले असून सभापती रंजना वास्कर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी बोलताना आमदार महेश बालदी यांनी पुढील १५ ते २० दिवसांमध्ये घेरावाडीतील प्रत्येक घरात पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य मयुर शेलार, माजी सरपंच सदाशिव वास्कर, गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभापती रंजना वास्कर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
बोअरवेल आणि सोलर पंपामुळे पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या दुर्गम घेरावाडीतील ग्रामस्थांना आता दिलासा मिळाला असून गावातच पाण्याची सोय झाल्याने विशेषतः महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना रेनकोट, शिक्षकांना छत्री वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …
RamPrahar – The Panvel Daily Paper