Breaking News

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
गोरगरिबांचे आधारस्तंभ, सर्व समाजाचे प्रेरणास्थान थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सत्कार सोहळा तसेच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या आणि नावलौकिक असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 13) सायंकाळी 6.30 वाजता उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर भव्य स्वरूपात होणार आहे. याबाबत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 10) येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यलयात झालेल्या या पत्रकार परिषदेला लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे कार्याध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे वनेमंत्री गणेश नाईक, महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी फलोत्पादन व खार जमीन विकासमंत्री भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रांत पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार धैर्यशील पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात मागील वर्षी भव्य कीर्तन महोत्सवाने झाली. भजन महोत्सव, 75 अभंग लोकार्पण, कबड्डी स्पर्धा, रक्तदान शिबिरे, नाट्य महोत्सव, रोजगार मेळावा, यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण, सामूहिक बासुरी वादन, नाट्य शिबिर, आगरी कोळी महोत्सव, शिधा वाटप असे अनेक समाजोपयोगी उपक्रम पुढे वर्षभर सुरू राहिले असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातून हजारो युवकांना रोजगार, शिक्षण व सामाजिक आधार देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उभ्या राहिल्या असून समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. समाजकारणाला प्राधान्य देणारे आणि दानशूर वृत्तीचे नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. गरीब कुटुंबातून पुढे येत त्यांनी संघर्षाच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्याचा मुख्य गाभा समाजसेवा आहे. शिक्षण, सामाजिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, आपत्ती मदत या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अनेक शिक्षण संस्थांना मदत करून ग्रामीण आणि कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे त्यांनी खुली केली.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत गरजू लोकांना मदत करतात. समाजातील वंचित, पीडित आणि गरजू लोकांना आधार देणे हे त्यांचे जीवनव्रत आहे. राजकारणात असूनही त्यांनी नेहमी समाजकारणाला अग्रक्रम दिला. त्यांच्या साधेपणा, जनसंपर्क आणि लोकाभिमुख कार्यामुळे ते महाराष्ट्रातील एक आदर्श लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा अमृतमहोत्सवी वर्ष महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहे. त्याच अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनावर आधारित आढावा घेणाऱ्या ‌‘रामपर्व‌’ या विशेष पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून त्याचे प्रकाशनही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
उलवे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने उभारण्यात आलेली रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ही प्रशस्त इमारत, सुसज्ज वर्गखोल्या अत्याधुनिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीमुळे परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या विद्यालयाचा उद्घाटन सोहळा यावेळी संपन्न होणार आहे.
या विशेष सोहळ्यास पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, समितीचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

Check Also

मराठी चित्रपटांसाठीचे पुरस्कारही वैशिष्ट्यपूर्ण

चित्रपट संस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, पुरस्कार. असे पुरस्कार म्हणजे आपण केलेल्या कामाची विशेष दखल आणि …

Leave a Reply