Breaking News

गाढी नदी संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल : रामप्रहर वृत्त
’गाढी नदी वाचवू या’ या उपक्रमातून गाढी नदीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे, पण यासाठी सर्वांनी या संवर्धन मोहिमेत सहभाग घेणे गरजेचे असून, गाढी नदी संरक्षण व विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 28) खांदा कॉलनी येथे केले.
गाढी नदीचे पात्र स्वच्छ व सांडपाणीमुक्त ठेवणे आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठक आयोजित केली होती.  पंचायत समिती सभापती प्रणाली भोईर, उपसभापती वसंत काठावले, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, गटविकास अधिकारी डी. एन. तेटगुरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, निसर्ग मित्र संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत श्री. कानिटकर यांनी ’गाढी नदी वाचवू या’ उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली. श्री. सुमित यांनी अभियानाचा आतापर्यंतचा प्रवास, श्रमदान आणि त्याचे नियोजन, त्यामागची भूमिका यांचे फोटोंसह सादरीकरण केले. त्यानंतर आमदार
प्रशांत ठाकूर यांनी नदी स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत ग्रामस्थांनीही आपली जबाबदारी बजावावी असे, सांगून गटविकास अधिकारी  आणि ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चा घडवून आणली. या वेळी निधी नसणे, जागा उपलब्ध नसणे, मार्गदर्शन नसणे आदी ग्रामपंचायतींच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. त्यावर उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.
नदी स्वच्छतेबरोबरच नदीपात्रात कचरा, निर्माल्य पडू नये यासाठी लोकांना पर्याय म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सौजन्याने गाढी नदीवरील चिपळे पुलाजवळ निर्माल्य कलश बसविण्यात आला. त्याच अनुषंगाने 26 जानेवारीपर्यंत गावोगावी निर्माल्य कलश, घंटागाडी आणि कचराकुंडी यांची व्यवस्था करण्याचे ग्रामपंचायतींनी मान्य केले. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन, ओला कचर्‍यापासून खत निर्मिती आदी विषयांवर पंचायत समिती, प्रशासन आणि ग्रामपंचायत एकत्रितपणे उपाययोजना करतील, अशी सकारात्मक भूमिका पुढे आली. त्या अनुषंगाने गाढी नदी स्वच्छ, सुंदर करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, निसर्गमित्र आणि प्रशासनाने घेतला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply