Breaking News

रायगडात जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान

पोलीस ठाण्यांमध्ये महिलांची नेमणूक

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये रविवारी (दि. 8) दैनंदिनी कर्तव्याकरिता महिलांची नेमणूक करून रायगड पोलीस दलातर्फे जागतिक महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तसेच पोलीस ठाण्यांमध्ये नेमणुक असलेल्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग शहरात मोटारसायकल रविवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोटारसायकल रॅली पोलीस अधीक्षक कार्यालय येथून काढण्यात येऊन ती अलिबाग समुद्रकिनारा, एसटी स्टँड, महेश टाँकीज, रामनाथ रोड, पोलीस मुख्यालय मार्गे पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आली. तिथे मोटारसायकल रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीमध्ये अलिबाग विभाग उप अधीक्षक सोनाली कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय व पोलीस ठाण्यामधील   महिला अधिकारी, कर्मचारी तसेच दामिनी पथक, बडीकॉपच्या अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.  पोलीस ठाण्यात येणार्‍या प्रत्येक व्हिजिटर व तक्रारदार महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.  समाजातील महिलांना कुठेही काहीही अडचण आल्यास दामिनी पथक, बडीकॉप तसेच प्रत्यक्षात तात्काळ मदत करावी, असे  आवाहन सर्व पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांना करण्यात आले.

मुरूडमध्ये सहा महिलांचा सत्कार

मुरूड : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्ताने अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री विज्ञान महाविद्यालय व मुरूड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी (दि. 8) सहा कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.

आंबोली तलाठी रेश्मा मसाल, नज अकॅडमीच्या उपमुख्याध्यापिका उषा साखरकर, स्कुल बस चालक अन्वी श्रीवर्धनकर, सामाजिक कार्यकर्त्या निलोफर हमदुले, शिक्षिका कीर्ती भगत आणि पोलीस शिपाई आरती पवार यांना सहाय्य्क पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ, सन्मान पत्र व चांदीचा मुकुट देवून सन्मानित करण्यात आले. या वेळी रंगराव पवार यांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी असलेल्या विशेष कायद्यांची माहिती सांगितली. सूत्रसंचालन आंझर उलडे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधव यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. या वेळी अंजुमन इस्लाम शैक्षणिक संस्थेचे जनरल सेक्रेटरी हिफजुरहेमान नझीरी, अंजुमन आयटीआयचे चेअरमन समीर दौनाक, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय करडे, सहसचिव सुधीर नाझरे, अ‍ॅड. शादाब काटे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

पेणमध्ये महिलांचा कलाविष्कार

पेण : प्रतिनिधी

महिलांनी महिलांचे कलाविश्व फुलवावे, यासाठी पेण नगर परिषदे तर्फे महात्मा गांधी ग्रंथालयाच्या भव्य पटांगणावर ‘मिळून सार्‍या जणी, घेऊ उंच भरारी‘ या संकल्पनेखाली महिलांचा रंगारंग कार्यक्रम घेण्यात आला. त्यात अनेक महिलांनी नृत्य स्पर्धा, पैठणी स्पर्धा व हळदी कुंकू अशा विविध कार्यक्रमातून आपल्या गुणांचे सादरीकरण केले. श्री पाटणेश्वर बँकेच्या अध्यक्षा कौसल्या पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार प्रदान केला. या वेळी लकी ड्रॉ पद्धतीने विजेत्या ठरलेल्या महिलांना आमदार रविशेठ पाटील आणि कौसल्या पाटील यांच्या हस्ते पैठणीचे वाटप करण्यात आले. समुह नृत्य स्पर्धेतील विजेत्या महिला मंडळांना कौसल्या पाटील व नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या वेळी रविशेठ पाटील यांचा महिला भगिनींच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्रृती बोंद्रे यांनी केले.  उपनगराध्यक्षा वैशाली कडू, नगरसेविका नलिनी पवार, अश्विनी शाहा, देवता साकोसकर, धनश्री समेळ, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, शहराध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, परिक्षक जयेश पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेण नगर परिषद कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

’जोडी तुझी माझी’मध्ये विजू केसरकर व ज्योती घाटे जोडी प्रथम

पोलादपूर : प्रतिनिधी  

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील दिशा सांस्कृतिक ग्रुपने घेतलेल्या ’जोडी तुझी माझी’ या कार्यक्रमामध्ये विजू केसरकर व ज्योती घाटे जोडी विजेती ठरली. या वेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल प्राची शिरगावकर, अश्विनी रावळ, चंद्रकला वानोळे यांचा सत्कार करण्यात आला. प्राची शिरगावकर यांनी या वेळी कायद्याचे संरक्षण देण्यासाठी पोलीस खात्याची तत्पर सेवा याविषयी मार्गदर्शन केले.

जोडी तुझी माझी ही स्पर्धा आई-मुलगी, सासू-सून, जावा-जावा, नणंद- भावजय, मैत्रीणी-मैत्रीणी, बहिणी-बहिणी अशा 25 स्पर्धक जोड्यांमध्ये घेण्यात आली. या वेळी परफेक्ट मॅचींगमध्ये अस्मिता तलाठी आणि केतकी तलाठी ही जोडी प्रथम आली. रिया मोरे व अर्चना मंगेश पालकर, प्राची सुतार व नेहा सुतार, सुवर्णा बागडे व भक्ती पेंडसे या तीन जोड्यांनी पारितोषिके प्राप्त केली. अंताक्षरी प्रकारांमध्ये निती पार्टे आणि सोनाली महाडिक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वर्षा पटेल यांनी सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. आणि तीनही प्रकारांमध्ये विजू केसरकर आणि ज्योती घाटे या जोडीने प्रथम क्रमांक व जोडी तुझी माझी या स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले.

स्नेहल दोशी आणि परीक्षक अश्विनी शेठ, माई शेठ, कांचन बुटाला, अश्विनी गांधी, अस्मिता तलाठी यांच्यासह दिशा ग्रुपच्या अध्यक्षा, पदाधिकारी आणि शहरातील महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्रीदेवी गंगामाता सभागृहात रंगलेला हा आनंद सोहळा यशस्वी करण्यासाठी दिशा ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व सदस्य महिलांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply