उरण : वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला झाहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला घरात राहणे ही गुरुकिल्ली आहे. तरीसुद्धा काही हवशे-नवशे रस्त्यावर फिरत असतात. अशा शायनिंग बहाद्दरांवर उरण पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी कोरोना 2020 सूचना आदेश देऊनही शासकीय आदेशाचा भंग करून उरण नगरपालिकेच्या नागरी हद्दीत काही तरूण विनाकारण फिरत असल्याचे आढळून आले. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलिसांनी शनिवार (दि. 28 मार्च) पासून ते शनिवार (दि. 4 एप्रिल) पर्यंत विनाकारण फिरणार्या गाड्या जप्त करण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत 39 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. 13 गुन्हे दाखल, त्यांच्याकडून 32 मोटरसायकली जप्त केल्या आहेत, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे. याविषयी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये काही तरुण विनाकारण फिरत होते. त्यांच्यावर सरकारी आदेशाचा भंग करून त्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 188, 269, 270, 271 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आजपर्यंत 32 दुचाकी वाहने जप्त करून पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आली आहेत.