पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 18) खारघर शहर आणि गावात नागरिकांना
अर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या औषधाचे वाटप करण्यात येणार आहे. स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी ही माहिती दिली.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले असून, सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामोठे आणि खारघरमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, कारण या ठिकाणाहून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यामार्फत या रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे, परंतु नागरिकांनी या आजाराला घाबरू नये. योग्य काळजी घेतल्यास कोरोनावर मात केली जाऊ शकते असे दिसून आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकारकशक्ती वाढावी यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयुष मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून सोमवारी खारघर येथे अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे वाटप केले जाणार आहे. स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील हा आरोग्यदायी उपक्रम राबविणार आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper