नवी दिल्ली : वृत्तसंस्था
स्थलांतरित मजूर हे आपल्या देशाचा पाया आहेत. प्रवासी मजुरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरेच काम केले आहे हे प्रवासी मजुरांचा अपमान करतात त्यांना माहीत नाही. पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात याची विरोधकांना कल्पना नाही, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे जनतेला संबोधित केले. त्या वेळी ते बोलत होते. विकसित राज्यांच्या विकासामध्ये बिहारच्या बांधवांचाही हात असल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकारने प्रवासी मजुरांसाठी श्रमिक एक्स्प्रेस सुरू करण्याचे काम केले. याव्यतिरिक्त बिहारमध्ये राज्य सरकारनेही अनेक उपाययोजना केल्या. मजुरांना केवळ 1100 रुपये देण्यात आले नाहीत, तर त्यांच्यासाठी आता रोजगाराचीही सोय केली जात आहे, असे शाह यांनी सांगितले.
या वेळी शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. आयुष्यमान भारत हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तब्बल एक कोटी लोकांनी पंतप्रधानांमुळे कोणत्याही खर्चाशिवाय शस्त्रक्रिया करून घेतल्या. याव्यतिरिक्त उज्ज्वला योजनेतंर्गत आठ कोटी महिलांना एलपीजी गॅसची जोडणी मिळाली आणि त्यांना धुरापासून मुक्ती मिळाली.
विरोधक या रॅलीला निवडणुकीशी जोडत आहेत, परंतु याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. कोरोनाचा सामना करताना लोकांशी संवाद साधणे अशक्य होत आहे. त्यामुळे अशा माध्यमातून लोकांशी संपर्क साधला जात आहे. विरोधक दिल्लीत बसून मौजमजा करण्याऐवजी अशा प्रकारे लोकांशी का संवाद साधत नाहीत? त्यांना कोणी अडवले आहे?, असा सवालही शहा यांनी या वेळी केला.
भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्यानंतर मोदींसारखा नेता मी पाहिला नाही. मोदींच्या एका शब्दावर लोक एकत्र आले. कोरोनादरम्यान त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्या वेळीही त्यांच्या एका शब्दावर सर्वजण एकत्र आले आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले, असे शाह यांनी म्हटले.
Check Also
उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी
आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …
RamPrahar – The Panvel Daily Paper