Breaking News

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून 38 जणांवर कारवाई

मोहोपाडा ः प्रतिनिधी

रसायनी परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतीने कडक पावले उचलली असून मास्क न वापरणार्‍या 36 जणांवर कारवाई करीत 15,200 रुपयांचा दंड वसूल केला, तर बाजारपेठेतील दोन दुकानदारांकडून ग्राहकांसाठी सोशल डिस्टन्ससाठी उपाययोजना न केल्याने ग्राहक गर्दी करीत असल्याने मोहोपाडा बाजारपेठेतील दोन दुकानदारांवर कारवाई करीत प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारला आहे. पहिल्याच दिवशी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने 38 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 17,200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. याकामी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीला रसायनी पोलिसांचेही सहकार्य लाभत आहे.

सध्या संपूर्ण देशात, राज्यात व ग्रामीण भागात कोरोना महामारीचे भयंकर संकट ओढावले आहे. यावर नियंत्रणासाठी शासन आपल्या परीने नागरिकांमध्ये जनजागृती करून अथक उपाययोजना करीत आहे. शहरांसह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांतील नागरिकांमध्येही कोरोनाची दहशत पसरली आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे तसेच सर्व सदस्य व कर्मचारी, स्वच्छता कमिटी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

त्या अनुषंगाने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी चेहर्‍यावर मास्क, रुमाल न वापरल्यास 500 रुपये, सार्वजनिक स्थळी थुंकल्यास 500 रुपये, सर्व दुकानदार व ग्राहकांनी सामाजिक अंतर न ठेवल्यास दुकानदाराला एक हजार दंड, तसेच दुसर्‍यांदा असे वर्तन केल्यास भा. दं. वि. कलम 188, 269 व 270सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951मधील कलम 115नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल. तरी नागरिकांनी खबरदारी घेऊन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply