Breaking News

गणेशमूर्ती कारखानदारांना कोरोनाचा फटका

नागोठणे ः प्रतिनिधी

दरवर्षी गणेशमूर्तींची जून महिन्यापासून आगाऊ नोंदणी होत असते, मात्र श्रावण महिना सुरू होऊनही दरवर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त मूर्तींची नोंदणीच झाली नसल्याने कोरोनाच्या महामारीचा फटका येथील एका दिव्यांग कारखानदाराला बसला आहे. तयार अर्ध्याअधिक मूर्ती शिल्लक राहिल्या तर प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी खंत व्यक्त करण्यात आली.

येथील खडकआळीत राहणारे प्रवीण राऊत दिव्यांग असून आपली दिव्यांग पत्नी तसेच इतर चार-पाच कामगारांसह दरवर्षी गणेशमूर्तींचा व्यवसाय करतात. मे महिन्यात पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवा, दादर आदी गावांतून घडविलेल्या गणेशमूर्ती आणून मूर्तीला सुबक अशी रंगरंगोटी करून त्याची विक्री करीत असतात. दरवर्षी 250 ते 300 मूर्ती आणल्या जातात, असे दिव्यांग कलाकार प्रवीणचे वडील लक्ष्मण राऊत यांनी सांगितले. जून महिन्यापर्यंत साधारणतः 250 गणेशमूर्तींची आगाऊ नोंदणी होत असते. गणेशोत्सवाला आता महिनासुद्धा राहिला नाही, मात्र कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी 150 गणेशमूर्तींचेसुध्दा आगाऊ बुकिंग झाले नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. चार महिन्यांचे जागेचे भाडे, विद्युत पुरवठा तसेच गणेशमूर्ती व त्याला लागणारा खर्च हा साधारणतः दोन लाखांपर्यंत जातो आणि रंगकामासाठी पाच कामगार कार्यरत असतात. त्यांच्या पगारावर हजारो रुपये खर्ची पडत असतात, परंतु अजून शंभरएक मूर्ती विकल्या गेल्या नाहीत तर प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची भीती त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply