Breaking News

शेकाप माझा कट्टर वैरी : रवीशेठ पाटील

नागोठणे : राजू भिसे

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष हा माझा कट्टर वैरी असून, काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने शेकापशी आघाडी करण्याचा प्रयत्न करीत होते, त्याला माझा ठामपणे विरोध होता. त्यामुळेच मी काँग्रेस सोडून भाजपच्या विकास प्रवाहात सहभागी झालो, असे ठाम प्रतिपादन माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी ‘रामप्रहर’शी विशेष मुलाखत देताना स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यातील काँग्रेसला संजीवनी देणारे, काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून पेण मतदारसंघात काँग्रेसला निश्चितच हादरा बसल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत पाटील यांच्याशी संवाद साधला असता, शेकाप हा माझा कट्टर वैरी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला. भारतीय जनता पक्ष सत्तेच्या माध्यमातून राज्यात, तसेच संपूर्ण देशात विविध अशा महत्त्वाकांक्षी योजना राबवून घोडदौड करीत आहे. या घोडदौडीत पेण मतदारसंघाला कोणी वालीच नसल्याने आपल्या मतदारसंघात विकासकामे पाहिजे असतील, तर भाजपशिवाय पर्याय नाही असे निदर्शनास आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मतदारसंघाला निश्चितच न्याय मिळेल, अशी मनोमन खात्री पटल्याने भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, असे रवीशेठनी सांगितले. पेण नगर परिषद सध्या माझ्याबरोबरच आहे, असे स्पष्ट करताना आगामी विधानसभा निवडणुकीत युतीच्या माध्यमातून पेण-नागोठणे-सुधागड मतदारसंघात आपण भाजपचे उमेदवार असाल का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी निवडणुकीला अजून सहा महिने असून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे सांगितले. नागोठणे शहरासह विभागातील बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते आजही माझ्याबरोबर असून मतदारसंघातील 90 ते 95 टक्के काँग्रेसवाले माझ्याबरोबरच असल्याचे पाटील यांनी या वेळी ठासून सांगितले. माझ्या भाजपप्रवेशाने युतीचे उमेदवार अनंत गीते यांची बाजू आणखी मजबूत झाली असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

माझ्या पेण मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्यांचे ठामपणे म्हणणे होते की, शेकाप हा काँग्रेसचा पारंपरिक शत्रू आहे व येथील काँग्रेसची मंडळी त्यांच्या म्हणजेच शेकापच्या विरोधात आयुष्यभर लढत आली आहे. असे असतानाही काँग्रेस जर आता त्यांना म्हणजे शेकापला यापुढे मते द्यायला सांगेल, तर ते आम्हाला मान्य नाही आणि कार्यकर्त्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस सोडली असून, भाजप विकासाच्या दृष्टीने राज्यासह संपूर्ण देशात क्रांती घडवीत आहे, हे सत्य असल्याने भारतीय जनता पक्षात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
-रवीशेठ पाटील, माजी मंत्री

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply