खडसेंच्या सूनबाईंचा राज्य सरकारला इशारा
मुक्ताईनगर : प्रतिनिधी
वीज बिलात सवलत देण्याची भाषा करणार्या राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता आपला शब्द फिरवला आहे. याविरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सूनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. वीज ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे, मात्र राज्य सरकारने याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास जनहितासाठी भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार खडसे यांनी दिला आहे.
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, ‘जेवढे बिल आलेले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल’, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य सपशेल चुकीचे आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बिल माफ करू, असे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते, मात्र नितीन राऊत हे एक चांगले नेते आहे. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकले नसले तरी काही प्रमाणात ग्राहकांना सवलत द्यायला हवी, अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलन करण्याची गरज पडत आहे. कारण भाजप हा वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी आंदोलन करीत आहे, असेही खासदार खडसे यांनी सांगितले.
दरम्यान, दिवाळीपूर्वी वीज ग्राहकांना गोड बातमी देऊ म्हणणार्या ऊर्जामंत्र्यांनी कडू बातमी दिली, अशी टीका वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केली, तर वाढीव वीज बिलाबाबत दिलासा दिला जाईल, असे वारंवार सांगणारे ऊर्जामंत्री राऊत यांनी याबाबत यू-टर्न घेऊन ग्राहकांची फसवणूक केली आहे. राऊत यांच्याविरुद्ध विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणला जाईल. खोटारड्या सरकारला हजार व्हॉल्टचा शॉक देणे आवश्यक आहे, असे भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
राजू शेट्टीही संतापले
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींनीही दंड थोपटले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत वारंवार सांगत होते, आम्ही काही ना काही मदत करू, दिवाळीला गोड बातमी देऊ. सक्तीची वसुली करा ही गोड बातमी? सरकारमधील मंत्री अशा प्रकारे बेजबाबदार विधान करीत असतील तर सरकारवरचा आणि मंत्र्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास उडेल. आम्ही वीज बिल भरणार नाही. सक्तीची वसुली करून बघा जशास तसे उत्तर देऊ, रस्त्यावर उतरू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.