Breaking News

मुंबईच्या विभाजनाला शिवसेनेची मूक सहमती? -अ‍ॅड. आशिष शेलार

सावंतवाडी : प्रतिनिधी

मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त असले पाहिजेत, ही मुंबईच्या विभाजनाची जी मागणी केली आहे, त्याला शिवसेनेची मूक सहमती आहे काय? नसेल तर काँग्रेसला खडे बोल सुनवा, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घालून सत्तेतून बाहेर काढा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली. आमदार आशिष शेलार दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौर्‍यावर असून ग्रामपंचायत निवडणूक तयारी प्रचार याबाबत पक्षाच्या यंत्रणेचा आढावा घेत आहेत. रविवारी (दि. 10) त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील दांडेली, तळवडे, इन्सुली, मळगाव या ग्रामपंचायत हद्दीत जाऊन तेथील भाजप कार्यकर्ते पदाधिकार्‍यांशी संवाद साधला व प्रचार कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधून त्यांनी या दौर्‍याबाबत माहिती दिली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी स्थानिक पातळीवरच करण्यात येत असून राज्याच्या नेतृत्वाने दिलेल्या सूचनांप्रमाणे एकूणच प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आज मी दौर्‍यावर आलो आहे. बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायतीचा आकडा पाहता कोकणातून भाजपला प्रचंड मोठे यश मिळेल, असा आशावादही शेलार यांनी व्यक्त केला. मुंबईच्या विभाजनाला शिवसेनेची सहमती आहे काय?आम्ही त्याला कडाडून विरोध करणार. मुंबई महापालिका कायद्यानुकसान पालिकेच्या प्रशासनाची सध्या असलेली रचना योग्य आहे. आम्हाला विभाजन, त्रिभाजन मान्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

सुरक्षा कमी करण्याचा राजकीय हेतू

भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षा कमी केल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, पोलिसांनी जनतेची सुरक्षा केली पाहिजे, जास्त पोलीस जनतेसाठी उपलब्ध असले पाहिजे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा विरोध नाही. पण ज्यांची सुरक्षा कमी केली त्यामध्ये भाजपाच्या नेत्यांचीच नावे जास्त आहेत. त्यावरून राजकीय हेतूने निर्णय घेतल्याचे दिसून येते आहे. कोकणचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा कॅटेगरी कमी केली जाते आणि दुसरीकडे आमदार वैभव नाईक यांना सुरक्षेचा कॅटेगरी वाढवली जाते यावरून सुडबुद्धीचे राजकारण कसे सुरू आहे हे स्पष्ट होते. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना अशाप्रकारे वागणूक दिल्याचे देशभरात कुठेही पाहायला मिळणार नाही, हे चित्र महाराष्ट्रातील दुर्दैवी चित्र आहे, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply