वीकेण्ड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
माणगाव : प्रतिनिधी
कोविडच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनला माणगावात रविवारी (दि.18) पोलिसांच्या नाकेबंदीमुळे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रविवारी सकाळपासून रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स व दुध डेरी सोडून इतर सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे माणगाव बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. माणगाव तालुक्यात कोविडचे रुग्ण दरदिवस वाढत असून शनिवारी (दि. 17) सायंकाळी 5 वाजेपर्यंत 41 रुग्ण आढळले. तालुक्यात सध्या एकूण 214 कोरोनाबाधीत रुग्ण आहेत.
शनिवारी वीकेण्ड लॉकडाऊन असतानाही काही भाजी व फळ विक्रेते, चिकन विक्रेते, बेकरीवाले यांनी आपली दुकाने उघडली होती. पोलिसांनी यांना तंबी दिली होती. त्यामुळे रविवारी येथील बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. दरम्यान, आपल्या दुकानासमोर गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी अन्यथा त्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल. तसेच बाजारपेठेत वाहनांवरून फिरण्यार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा माणगाव नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने दिला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper