कोविड केअर सेंटरमधील रुग्ण झाले कमी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई शहरातील कोरोनामुक्तीचा दर पुन्हा एकदा 96 टक्क्यांवर गेला असल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णसंख्याही घटली आहे. महिनाभरात 5777 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने राधास्वामी व वाशी सेक्टर, 14 येथील काळजी केंद्रात शुक्रवारी एकही रुग्ण उपचाराधीन नव्हता.
28 एप्रिलपासून 28 मेपर्यंत महिनाभरात 5777 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सर्वप्रकारच्या खाटा आता उपलब्ध आहेत. शहराबाहेरील रुग्णही आता या खाटांवर उपचार घेत आहेत. राधास्वामी सत्संग केंद्र व वाशी सेक्टर, 14 येथील काळजी केंद्रात शुक्रवारी एकही रुग्ण उपचाराधीन नव्हता. राधास्वामी केंद्रात महिनाभरापूर्वी 344 तर वाशी सेक्टर-14 येथील केंद्रात 38 रुग्ण होते. सिडको प्रदर्शनी केंदात गेल्या महिन्यात 687 रुग्ण उपचार घेत होते. त्यातही निम्मे रुग्ण घटले असून आता 335 रुग्ण उपचाराधीन आहेत. तर डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात 273 तर वाशी ईटीसी केंद्रात 58 रुग्ण उपचार घेत आहेत. ही तीन केंद्रे सोडली तर इतर केंद्रात 30 पेक्षा कमी रुग्ण आहेत.
नवी मुंबईत सातत्याने रुग्णांची संख्या कमी होत असून उपचाराधीन रुग्णसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी हा मोठा दिलासा आहे. नागरिकांनी रुग्ण कमी झाले तरी कोरोना नियमावलीचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper