माथेरानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कर्जत ः बातमीदार
प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये शिवसेनेसाठी राजकारणाचे उलटे वारे वाहू लागले असून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांना बळकटी देणार असल्याची ग्वाही भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 6) माथेरान दौर्यात दिली. माथेरानमध्ये कमळ फुलवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असेही ते या वेळी म्हणाले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने गरीब, गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे थंड हवेचे पर्यटनस्थळ माथेरानच्या अर्थकारणाचा कणाच मोडल्याने येथील सर्वसामान्यांना कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे माथेरानकरांना दिलासा म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, माथेरान शहराध्यक्ष विलास पाटील, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, प्रवीण सकपाळ, कुलदीप जाधव, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बिना कदम, संदीप कदम, अशोक शिंदे, त्रिभुवन तिवारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भाजपवर विश्वास टाकून प्रवेश केलेल्या माथेरानमधील नगरसेवकांच्या सोबत भाजप आहे. येणार्या काळात पर्यटन व्यवसायाशी निगडीत अडचणी, वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील समस्या तसेच येथील घरांना अधिकृत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जाईल. त्याचबरोबर नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आपण केलेले परिवर्तन समाजाच्या हितासाठी आणि माथेरानच्या विकासासाठी आहे. यासाठी जे प्रत्यक्ष बोलतो ते करीत राहून एक नवा बदल घडवून आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper