Breaking News

प्रदीर्घ संघर्षांनंतर मिळविलेले यश रोमहर्षक -आमदार प्रशांत ठाकूर; रोठ बुद्रकमध्ये ग्रामसचिवालयाचे उद्घाटन, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

धाटाव ः प्रतिनिधी

रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर आलेले सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर मिळविलेले यश हे रोमहर्षक असल्याचे त्यांच्या भावनेतून दिसून येते. या यशासाठी त्यांनी 25 वर्षे त्यांच्या विरोधकांविरुद्ध लढा दिला. हे करीत असताना त्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला. प्रसंगी गुन्हे दाखल होऊन तुरूंगात जावे लागले, मात्र याला न घाबरता, न डगमगता त्यांनी आपला संघर्ष चालू ठेवला आणि येथील जनतेला विकास काय असतो हे दाखवण्याची संधी मिळताच कंपन्यांचा सीएसआर व प्रशासनाचा निधी वापरून ग्रामसचिवालय आणि इतर कामांबाबतीत विक्रम करून दाखविला आहे, अशा शब्दांत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमधील विद्यमान सत्ताधार्‍यांचे कौतुक केले. रोहे तालुक्यातील रोठ बुद्रुक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन आणि जलशुद्धीकरण आरओ प्लांटचे भूमिपूजन शनिवारी (दि. 16) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या सोहळ्यास भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, प्रदेश सचिव रवी मुंडे, दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष राजेश मापारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा रोठ बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अमित घाग, शिवसेना रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, विभागप्रमुख संतोष खेरटकर, महिला विभागप्रमुख अमृता साळुंके, रोहिणी गोसावी, भाजप धाटाव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, शिवसेना शाखाप्रमुख निलेश वारंगे, सरपंच नितीन वारंगे, रघुनाथ कोस्तेकर, नरेश कोकरे, अनिस शिंदे आदी भाजप, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, आपण ज्या पद्धतीने गावचा विकास करीत आहात त्याच पद्धतीने येथील युवा पिढीला रोजगार मिळाला पाहिजे, मुलांना उत्तम शिक्षण, स्त्रीशक्तीला उभारी देण्यासाठी आपण एकत्र एकत्रित राहून काम केले पाहिजे. येथील जनतेने तुमच्यावर जो विश्वास दाखविला आहे तो सार्थ ठरवला पाहिजे आणि यासाठी देशाचे नवे पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या खात्याच्या माध्यमातून व शासनाच्या विविध योजनांतर्गत आपण नक्की अधिक जोमाने पद्धतीने विकास करू.

गावाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो. आमच्यापुढे विकासाची मोठी आव्हाने होती. रोठ बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक आम्ही शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडून आणली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येऊन येथे विकास साधू.

नितीन वारंगे, सरपंच, रोठ बुद्रुक

रायगडचे माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठबळामुळे संघर्ष करण्याची ताकद मिळाली आणि आजवर लढलो. त्यामुळेच 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला या ग्रामपंचायतीवर युतीच्या माध्यमातून झेंडा फडकवू शकलो. त्यानंतर विकासकामे करून विकास खर्‍या अर्थाने काय असतो हे विरोधकांना दाखवून दिले, असे या वेळी भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य अमित घाग यांनी सांगितले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply