जुने वर्ष सरून नवे वर्ष सुरू झाले आहे. यंदा नववर्षाच्या स्वागताचा तितकासा उत्साह दिसून आला नाही. याचे कारण दुसरे तिसरे काहीही नसून कोरोना हेच आहे. गेली दोन वर्षे या वैश्विक महामारीने जगभर वाताहत केली असून हे संकट थांबायचे नाव घेत नाहीए. उलट नवनवी रूपे घेऊन कोरोना डोके वर काढत आहे. त्यामुळे चिंता कायम आहे.
2021 या वर्षाला निरोप देऊन सर्वांनी 2022 सालामध्ये प्रवेश केलेला आहे. तसे पाहिले तर गेली दोन वर्षे अवघ्या मानवजातीने अतिशय बिकट परिस्थितीत काढली आहेत. सन 2020पासून जगावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले आणि बघता बघता त्याने अवघ्या जगाला आपल्या कवेत घेतले. त्यानंतर जे काही होत गेले ते केवळ हतबलतेने पाहत राहण्यावाचून सुरुवातीच्या काळात दुसरा काही मार्ग नव्हता. अगदी अमेरिका, ब्रिटन, रशिया यांच्यासारखी बलाढ्य राष्ट्रदेखील कोरोनाच्या लाटेत अक्षरश: वाहून गेली. त्यानंतरही कोरोनाच्या लाटा येत राहिल्या आणि त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर जाणवला. आपल्या देशातही आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. आता जगभरात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव सुरू झालेला आहे. भारतातही याचे रुग्ण आढळत आहेत. एकीकडे मूळ कोविड-19ने पुन्हा एकदा डोके वर काढले असताना नवा उत्प्रेरक ओमायक्रॉनही हात पाय पसरू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. देशात यापूर्वी कोरोनाचे दैनंदिन पाच हजार रुग्ण आढळत होते. तो आकडा सध्या 20 हजारांच्या पार गेलाय. सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखाच्या आहे. कोरोनामुळे जीव गमावणार्यांची संख्या सुमारे पाच लाखांच्या घरात पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी लोक संसर्गमुक्त झाले आहेत. दुसरीकडे देशभरातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 1525वर पोहचली आहे. गंभीर म्हणजे कोरोनाप्रमाणेच ओमायक्रॉन रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे दुहेरी कसोटी आहे. अशा परिस्थितीत या संकटाविरोधात नेटाने लढा देणे अपेक्षित असताना राज्यात तीन दिशेला तोंडे असणारे सरकार सत्ता उपभोगण्यात मश्गूल आहे. यांना जनतेचे काही एक घेणेदेणे नाही. केवळ स्वार्थ जपण्यात ही मंडळी गुंग आहेत. सुदैवाने भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम व खंबीर नेतृत्व लाभले आहे. ते केंद्रीय पातळीवरील सर्व यंत्रणा कामाला लावून कार्यरत आहेत. त्यांनी कोरोनावरील लसी, औषधे उपलब्ध करून दिली आहेत. देशात आतापर्यंत 145.16 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. सोमवारपासून 15 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. त्यानंतर आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठांना बूस्टर डोस दिला जाणार आहे, पण हे सर्व आहे म्हणून बेफिकीरपणा चालणार नाही. कोरोना महामारी सहजासहजी संपुष्टात येईल असे दिसत नाही. त्यामुळे मास्क, सामाजिक अंतर आणि स्वच्छता यांचा अंगीकार यापुढील काळातही करावा लागणार आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यापासून अनेक लोक नियमांचे सर्रास उल्लंघ करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. काहींच्या तोडांवरून मास्क गायब झाला आहे. असे कसे चालेल? काही गोष्टी पाळाव्याच लागतील. नाही तर कोरोना काही पाठ सोडणार नाही. ज्यांना हे उमगले ते सुरक्षित जीवन जगत आहेत आणि ज्यांना हे सांगूनही कळत नाही ते मात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांनाही हानी पोहचवत आहेत. नवे वर्ष आनंदाने घालवायचे असेल तर काळजी आणि सर्तकता बाळगावीच लागेल हे वेगळे सांगायला नको!
RamPrahar – The Panvel Daily Paper