Breaking News

पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत घडवूया : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

पनवेल : हरेश साठे
देशाला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तीशाली करणे; भय, भूक, आंतक, भ्रष्टाचारापासून मुक्त करणे आणि जगातील नंबर एकची आर्थिक शक्ती बनविणे हे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून या देशाला पुढे न्यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताची संकल्पना हीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि. 3) पनवेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात केले.
मोदी सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या ठरणार्‍या महत्त्वाकांक्षी जेएनपीटी बंदर जोडरस्ता प्रकल्पाचे लोकार्पण, कळंबोली जंक्शन विस्तारीकरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराचे भूमिपूजन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी झाले. त्याचबरोबर त्यांनी उरण-जेएनपीटी-चौक या नवीन महामार्गाची घोषणाही ना. गडकरी यांनी या कार्यक्रमात करीत आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलून महाराष्ट्राच्या विकासाला अधिक चालना दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ चिंचपाडा गाव येथे झालेल्या या समारंभास पालकमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी पालकमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार देवेंद्र साटम, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक जे. एम. म्हात्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जेएनपीटीचे डेप्युटी चेअरमन उमेश वाघ, अदानी पोर्टचे नवी मुंबई विभाग प्रमुख व्ही. के. शर्मा, अश्विन मुदगल, प्रशांत फेगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गामध्ये 325 किलोमीटरने वाढ झाली असून गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात 10 हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असल्याची माहिती ना. नितीन गडकरी यांनी या वेळी दिली.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ना. नितीन गडकरी यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आपले जवळचे मित्र आहेत, असे आवर्जून नमूद केले त्याचप्रमाणे जेएनपीटी पोर्ट रोड, कळंबोली जंक्शन विस्तारीकरण तसेच आठपदरी जेएनपीटी ते चौक रस्त्याचे महत्त्वपूर्ण काम आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यातून होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पनवेल पोर्ट आणि एअरपोर्ट चांगले असल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. निर्यात वाढली की देशाची प्रगती वाढते. प्रगती झाली की रोजगार वाढतो आणि प्रगती व रोजगार वाढल्यावर आपला देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. आज मुंबई, नवी मुंबई, जेएनपीटीचे जे दृश्य पाहायला मिळत आहे ते सुखद आणि आनंददायी आहे. ज्या ज्या अधिकार्‍यांनी या प्रकल्पासाठी मदत केली त्या सगळ्यांचे ना. गडकरी यांनी आभार मानले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कोकणची लाइफलाइन आहे. 2010पासून सुरू झालेले या महामार्गाचे काम 2022 म्हणजेच 12 वर्षांतही पूर्ण झालेले नाही, परंतु येत्या एक वर्षात मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणार आहे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले की, इटलीतील व्हेनिस शहरातील नागरिक पाण्यातून प्रवास करतात आणि त्या प्रवासाला खर्च कमी येतो. त्याप्रमाणे नवी मुंबई विमानतळावर प्रवासी वॉटर टॅक्सीने आले पाहिजेत. त्यासाठी तशी तयारी बीपीटीतर्फे केली असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या चार चाकी गाड्या सहा महिन्यांत फ्लेक्स इंजिनवर येणार आहेत. आणि त्या अनुषंगाने कमी खर्चाचा इथेनॉल वापर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आता पेट्रोलऐवजी इथॉन पंप टाका, असे आवाहनही त्यांनी केले.
ना. गडकरी यांनी पुढे म्हटले की, आज रायगड जिल्ह्यात अनेक दिवसांनी आलो. या रस्त्यावरून जाताना मला जुना काळ आठवला. त्या वेळेस मी बांधकाम खात्याचा मंत्री होतो आणि पनवेलवरून जेएनपीटीला अंधारातून जाताना तो रस्ता आठवला. या रस्त्यावर अनेक अपघात होत असत. त्यात अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. आज हा रस्ता पूर्ण झाला असून आता अनेक लोकांचे जीव वाचतील याचा मला अतिशय आनंद आहे. असा रस्ता रायगड जिल्ह्याला मिळाला त्याबद्दल मी रायगडवासीयांचे अभिनंदन करतो. पनवेल ते जेएनपीटी या रस्त्याचे काम अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरून केले असून या रस्त्यावर ज्या कंत्राटदार व अधिकार्‍यांनी काम केले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
किल्ले हे केवळ दगडाच्या भिंती नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास आहे आणि हा इतिहास भविष्यातील पिढीपर्यंत प्रभावीप्रमाणे पोहचला पाहिजे. त्यासाठी किल्यांचे जतन करण्याचा प्रस्ताव दिल्यास त्याचा विचार करण्याचे आश्वासन ना. गडकरी यांनी यावेळी दिले.
जेएनपीटी मार्गाच्या विकासानंतर गेल्या सात वर्षांत जेएनपीटीमध्ये एक लाख कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. जेएनपीटीत 2016मध्ये 570 कोटी रुपये खर्च करून विशेष आर्थिक क्षेत्र सुरू करण्यात आले आहे. त्यात आता 24 कंपन्या आलेल्या आहेत. या माध्यमातून 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक लवकरच होणार आहे आणि त्या अनुषंगाने दीड लाख युवकांना रोजगार मिळणार आहे, असेही ना. नितीन गडकरी यांनी सांगितले.
वर्षानुवर्षे बिकट अवस्था असलेल्या जेएनपीटी-उरण ते पनवेल मार्गामुळे उरण आणि पनवेल तालुक्याच्या विकासामध्ये बाधा येत होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अथक प्रयत्नाने उरण आणि पनवेल तालुक्यातील जनतेला उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाचा 3500 कोटींचा रस्ता मिळाला. 2014मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. या रस्त्याचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या महामार्गामुळे नागरिकांचा जेएनपीटी-उरण ते पनवेल, मुंबई असा प्रवास सुखकर आणि जलद झाला असून सोबतच अपघातांचे प्रमाण कमी झाले तसेच व्यापार वृद्धिंगत होऊन विकासाला खर्‍या अर्थाने गती मिळाली आहे.
कळंबोली येथील जंक्शनच्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने कळंबोली जंक्शन विस्तारीकरण प्रकल्प कळंबोली, कामोठे आणि पनवेलवासीयांना मिळाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली ते पनवेल-उरण-जेएनपीटीकडे जाणार्‍या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. पनवेल-उरण ते मुंबई- ठाणेकडून ही वाहतूक जेएनपीटीकडे ये-जा होत असताना अवजड कंटेनर, प्रवासी वाहतूक कळंबोली एमजीएम सर्कल येथून मार्गक्रमण करीत असते, त्यामुळे कळंबोली सर्कल हे ठिकाण रहदारीचे आणि महत्त्वाचे जंक्शन आहे. या सर्व ठिकाणी, स्थलांतरित किंवा कंटेनर वाहतूक 24 तास चालू आहे आणि या कारणास्तव वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच कळंबोली एमजीएम जंक्शन परिसरात भेडसावते आणि कधी कधी तासन्तास ट्रॅफिक जाम होतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळ वाया जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून पनवेलकरांची मुक्तता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती व त्या संदर्भात पाठपुरावाही केला होता. त्या अनुषंगाने 800 कोटी रुपये खर्चून कळंबोली जंक्शन विस्तारीकरण होणार असून त्याचे भूमिपूजन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. सोबतच नवी मुंबई विमानतळाचे पूर्व प्रवेशद्वार या 400 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजनसुद्धा या सोहळ्यात झाले. उरण-जेएनपीटी-चौक या नवीन महामार्गाची घोषणा या कार्यक्रमात ना. गडकरी यांनी केली.
ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारला जाणारा, सागरमाला प्रकल्पामधून जेएनपीटी आणि एनएचआयकडून तीन हजार कोटी रुपये किमतीचा हा रस्ता रायगड जिल्हा आणि उरण मतदारसंघातील नागरिकांना महत्वपूर्ण अनोखी भेट आहे. जेएनपीटीतून बोरखार, चिरनेर, आपटा, गुळसुंदे, मोहोपाडा, रसायनी ते चौकपर्यंत या आठपदरी होणार्‍या रस्त्यामुळे रहिवाशांना पोर्ट अगदी जवळ येणार आहे. त्यामुळे रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रालाहीसुद्धा चालना मिळणार आहे तसेच  बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. जवळच मुंबईचा लखलखाट असतानाही हा सर्व परिसर मात्र विकासापासून दूर होता. या होणार्‍या रस्त्यामुळे ती अडचण दूर होणार असून या आठपदरी रस्त्याची घोषणासुद्धा ना. नितीन गडकरी यांनी या वेळी केली. या एकूण प्रकल्पामुळे पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात नागरिकांना होणार आहे.

ना. नितीन गडकरी यांच्यामुळे भव्य काम उभे राहिले -आमदार प्रशांत ठाकूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे भव्य काम आपल्या भागात उभे राहिले. जागतिक दर्जाच्या रस्त्याचेे सुख आपल्या विभागात त्यांनी दिले आहे. त्यामुळे आपल्याला मोठा आनंद त्यांनी दिला आहे, अशा शब्दांत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, जेएनपीटी रस्त्यावर सतत अपघात व्हायचे. दरवर्षी कमिटी तयार व्हायची, सर्वे केला जायचा, पण प्रश्न निकाली लागत नव्हता. गडकरीसाहेबांनी यामध्ये विशेष लक्ष दिले आणि हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाला. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांचा प्रवास सुखकर झाला आहे. कळंबोली जंक्शन विस्तारणीकरणात त्यांनी लक्ष केंद्रित केले आणि हाही प्रश्न त्यांनी मार्गी लावला. त्यामुळे येथील जनता त्यांना भरभरून दुवा देत आहे. 2024 सालापर्यंत अमेरिकेतील दर्जाचे रस्ते भारतात करण्याचे उद्दिष्ट त्यांचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा भारत घडविण्याचे संकल्प केला आहे आणि त्या अनुषंगाने काम सुरू आहे. याबद्दल मी ना. नितीन गडकरीसाहेबांचे पुन्हा आभार मानतो.

पंतप्रधान मोदी, ना. गडकरींमुळे दुग्धशर्करा योग जुळून आला -आमदार महेश बालदी
येथील रस्त्यांची बिकट अवस्था होती. 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेएनपीटी पोर्ट रोडचे भूमिपूजन झाले आणि आज त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे हा दुग्धशर्करा योग आहे, असे उद्गार उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी काढले. या रस्त्यावर अनेक अपघात झाले अनेकांना जीवाला मुकावे लागले. गडकरीसाहेबांनी याकडे लक्ष दिले. जेएनपीटी ते चौक हा आठपदरी रस्ता होऊन बोरखार, चिरनेर, खारपाडा, आपटा, गुळसुंदे, रसायनी, चौक विभाग प्रगत होणार आणि जगाच्या नकाशावर हा मार्ग येणार आहे. माझ्या या मतदारसंघात तीन हजार कोटी रुपयांचा हा रस्ता होणार आहे. त्याबद्दल नामदार गडकरीसाहेबांचे खूप खूप आभार मानतो, असे नमूद करीत आमदार महेश बालदी म्हणाले की, उरण भागात वाहतुकीचे प्रमाण आहे आणि त्या अनुषंगाने गडकरीसाहेबांनी उरणला ट्रॉमा केअर सेंटर द्यावे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे आणि त्यासाठी गडकरीसाहेब भूमिपुत्रांसोबत राहतील ही अपेक्षा व्यक्त करतो.

आमदारांनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दूरदृष्टिकोन फक्त महाराष्ट्र, देशालाच नव्हे; तर संपूर्ण जगाला ज्ञात आहे. त्यांच्या योजना नेहमीच आदर्श ठरल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने देशाच्या नावलौकिकात भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना करायचे ते मनापासून करायचे आणि नागरिकांच्या व देशाच्या हिताचेच करायचे हा त्यांचा अट्टाहास असतो. सामान्य माणसाप्रमाणे त्यांचा वावर असला तरी काम प्रभावशाली असते. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या आगमनाची उत्सुकता रायगड जिल्ह्याला लागली होती. या वेळी नामदार नितीन गडकरी यांचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन स्वागत केले तसेच त्यांनी रायगड जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना दिल्याबद्दल ना. गडकरी यांचे आभार मानले.

देशाला नव्या मार्गावर नेण्याचे आणि सुकर मार्ग देण्याचे काम ना. नितीन गडकरी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत फक्त रस्ते नाही; तर जलमार्गाला चालना देण्याचेही काम होत आहे. शरीरात जशा रक्ताच्या वाहिन्या असतात तसे रस्ते बनविण्याचे काम त्यांनी केले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे नितीन गडकरी यांच्यामुळे झाला आहे.
-खासदार श्रीरंग बारणे

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply