राज्यात सध्या उष्णतेचा पारा चढत असताना राजकीय वातावरणही तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत चलो अयोध्याचा नारा दिला आहे. त्यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत भोंग्यांच्या विषयाचा पुनरूच्चार केला, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी मुंबईतील सभेत बाबरी मशीद पतनावरून सत्ताधारी शिवसेनेवर शरसंधान साधले. प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखली जाणारी शिवसेना ही पक्षसंघटना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्याच्या सत्तेवर बसल्यावर मात्र आपली भूमिका बदलताना दिसत आहे. नेमके हेच हेरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत नवी इनिंग सुरू केली आहे. औरंगाबादमध्ये रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा अधोरेखित केला. सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या एकदा, असे म्हणत दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका या वेळी राज ठाकरे यांनी जाहीर केली. ते म्हणाले, लाऊडस्पीकर हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे, पण जर तुम्ही त्याला धार्मिक रंग देणार असाल, तर त्याला आम्ही तसेच उत्तर देऊ. देशातील सर्व लाऊडस्पीकर खाली आले पाहिजेत. सर्वांना समान धर्म असला पाहिजे, असे सांगत जर उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी त्यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतची डेडलाईन देतो, अन्यथा दुसर्या दिवशीपासून मशिदींसमोर मनसेकडून हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशाराही दिला. या सभेत राज यांनी आपल्या आगामी दौर्यांबाबत भाष्य करीत आपण यापुढील सभा मराठवाडा, विदर्भ, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात घेणार आहोत, असे जाहीर केले. राज यांनी 5 जून रोजी अयोध्या दौरा करण्याचे घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभर सभा घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा मानस दिसतो. राज यांची औरंगाबादमधील सभा सुरू होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सभा घेऊन आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून रणशिंग फुंकले. या वेळी त्यांनी बाबरीचे पतन झाले, तेव्हा आपण तिथे उपस्थित असल्याचे सांगून कारसेवक म्हणून 18 दिवस तुरुंगामध्ये होतो, असेही म्हटले. बाबरी ही मशीद नव्हती. परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता. तो पाडण्यासाठी मी स्वत: तेथे होतो. बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 जणांना आरोपी केले होते त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही. ते सर्व भाजपचे नेते होते, असेही फडणवीस यांनी नमूद करीत शिवसेनेवर हल्लाबोल केला. मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत. राज्यात आता हनुमान चालिसा म्हटले की, राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मग तुम्ही कुणाच्या बाजूचे आहात रामाच्या की रावणाच्या, असा सवाल त्यांनी ठाकरे यांना उद्देशून केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 14 मे रोजी सभा घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी त्यानंतर सभा घेण्याची घोषणा या वेळी केली. त्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरणही गरम असेल असे दिसते.
Check Also
उरणमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा गैरव्यवहार करणार्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपयांचा अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्याविरोधात उरण …