गेल्या पाच दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. गेल्या वर्षीसारखी पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकारी पातळीवर सर्वतोपरि दक्षता घेतली जात आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आदि ठिकाणी रेड अॅलर्टचा इशारा जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ कोकणासह घाटमाथ्यावर देखील येते काही दिवस पावसाचे थैमान चालू राहील.
भारतीय जनता पक्षाच्या साथीने राज्यात सरकार स्थापन केल्यापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये असून गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावताच त्यांनी तातडीने खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात या काळात जोरदार पाऊस झाल्याने काही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली. चिपळूणमधील मागील वर्षीच्या भीषण पुराच्या आठवणी आजही सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. त्यामुळे चिपळूणमधील परिस्थितीकडे शासकीय यंत्रणा विशेष लक्ष ठेवून आहे. वसिष्ठी नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. पूरस्थिती उद्भवू शकेल अशा राज्यातील बहुतेक ठिकाणी एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) तुकड्या तैनात करण्यात आल्या असून चिपळूणमध्ये तर या दलाने गेल्या वर्षी ज्या भागातून वसिष्ठीचे पाणी शहरात शिरले त्या परिसराची पाहणीही केली. दरम्यान, या आठवड्यात सतत पडलेल्या पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिथे पुराचा धोका असेल त्याठिकाणी राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या असून मुंबई व आसपासच्या परिसराबाबतही विशेष काळजी घेतली जात आहे. पावसामुळे दरसालप्रमाणे मुंबई परिसरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. तीन दिवसांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर रोडवर अशाच जीवघेण्या खड्ड्यामुळे एका तरुण मोटर सायकल स्वाराला प्राण गमवावे लागले. या परिसरात इमारती आणि दरडी कोसळण्याच्या घटनाही नोंदल्या गेल्या आहेत. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात मुंबई परिसरात इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. लोकसंख्येची घनता प्रचंड प्रमाणात असल्याने या परिसरात इमारती आणि घरे एकमेकांना अगदी खेटून उभी राहिलेली दिसतात. त्यामुळे जेव्हा दुर्घटना घडते, तेव्हा प्राणहानी देखील अधिक प्रमाणात होते. मुंबई परिसरातील असंख्य धोकादायक इमारतींमध्ये आजही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असतात. महापालिकेचे अधिकारी कितीही नोटिसा देऊन गेले तरी धोकादायक झालेली आपली घरे सोडायला रहिवासी सहजासहजी तयार होत नाहीत. कारण धोकादायक इमारतींमधील हक्काचे घर सोडून ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहायला जाणे नको असते. ही समस्या फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही. महाराष्ट्रात अन्यत्र नदीकाठी वास्तव्य असलेल्या नागरिकांना पूरपरिस्थितीत घराबाहेर सुखरूप काढणे जिकिरीचे होऊन बसते. त्यामागे देखील हीच मानसिकता कारणीभूत आहे. धोका असलेल्या इलाख्यांमधील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच केले आहे. अर्थात पावसाने जोर धरला की सारेच जनजीवन विस्कळीत होते हे खरेच. पावसामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता दिलासा देणारी बाब म्हणजे राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. जलाशयांनी भरलेली धरणे कुठल्याही राज्यासाठी संजीवनी देणारीच ठरतात. सध्याच्या रेड अॅलर्टला ही काहिशी उजळ किनार म्हणावी लागेल.