Breaking News

नवी मुंबईत फोफावतोय मलेरिया, डेंग्यू

महापालिकेचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

गेल्या आठवड्याभरापासून पावसाने काही प्रमाणात उघडीप घेतली असून साचलेल्या पाण्यात डास अंडी घालत असल्याने हा काळ डास उत्पत्तीच्या दृष्टीने जोखमीचा आहे, हे लक्षात घेऊन डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेणे व ती नष्ट करणे या मोहिमा अधिक काळजीपूर्वक राबविण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागास दिले. तसेच, पावसाळी कालावधीतील साथरोग तसेच मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसारख्या आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.

आयुक्तांनी घेतलेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते. ज्या परिसरात मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, अशी नागरी आरोग्य केंद्रनिहाय विभागणी करावी व त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांतील आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास करून जेथे रुग्ण आढळत आहेत, त्या भागांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच, डास उत्पत्तीच्या दृष्टीने जोखमीच्या असणार्‍या बांधकाम साइट्सकडेही अधिक काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.

मोठ्या सोसायट्यांमधून डास उत्पत्तीस्थाने शोधासाठी येणार्‍या महापालिका कर्मचार्‍यांना प्रतिबंध केला जातो. या अनुषंगाने शोधमोहिमेसाठी सोसायट्यांमध्ये जाण्यापूर्वी तेथील अध्यक्ष अथवा सचिव यांना कळवून जावे व जाताना शोध पथकामध्ये शक्यतो एक तरी महिला कर्मचारी असावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तर, प्रवेश नाकारणार्‍या सोसायट्यांवर सामाजिक आरोग्यविषयक कार्यवाहीला बाधा आणल्याने दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

महापालिकेच्या वाशी रुग्णालयात मलेरिया व डेंग्यू रुग्णांवरील उपचारांकरिता वेगळा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच, डेंग्यूच्या आजारामध्ये प्लेटलेट्सची रुग्णांना भासणारी गरज महापालिकेमार्फत पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी, प्लेटलेट्ससाठी आवश्यक असणारी मशीन महापालिकेची स्वत:ची असावी, असेही आयुक्तांनी निर्देशित केले. डेंग्यू व मलेरियाप्रमाणेच स्वाइन फ्लूचे रुग्णही आढळत असून त्याच्या लक्षणांविषयी तसेच, तो होऊ नये म्हणून घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मलेरिया, डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असून नागरिकांनी डासांची निर्मिती होऊ नये म्हणून घर व परिसरात कुठेही पाणी साचू न देण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच, डास उत्पत्तीस्थाने शोधण्यासाठी अथवा रासायनिक फवारणीसाठी घरी, सोसायटी, वसाहतीत येणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना संपूर्ण सहकार्य करावे.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply