Breaking News

‘ममतादीदींची थप्पडही आशीर्वादच’

पुरूलिया ः वृत्तसंस्था

नरेंद्र मोदींना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते, असे वक्तव्य करणार्‍या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ममतादीदींनी मारलेली थप्पडही माझ्यासाठी आशीर्वादच आहेत, असे मोदींनी म्हटले आहे. चिटफंडच्या नावाखाली   गोरगरिबांच्या कमाईवर डल्ला मारणार्‍या घोटाळेबाजांनाही ममतादीदींनी अशीच थप्पड मारली असती, तर बरे झाले असते. असे झाले असते तर ममतादीदींना इतके घाबरावे लागले नसते, असा चिमटाही मोदी यांनी काढला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 9) पश्चिम बंगालमधील पुरूलिया येथे प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. जय श्रीराम, जय माँ काली, जय माँ दुर्गा, असा जयघोष करणार्‍यांवर ममता बॅनर्जी संतापतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची भीती दाखवली जाते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या चौकटीत राहून काम करीत नाहीत.

भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची पश्चिम बंगालमध्ये हत्या करण्यात आली, पण दिल्लीतील प्रसारमाध्यमे आणि काँग्रेस नेते गप्प आहेत, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केला.पश्चिम बंगालमध्ये मोदींविरोधात काहीच नसल्याने ममतादीदींचा मोदींवर राग आहे, पण त्या माझा राग जनतेवर काढत असून, हा जनतेवर अन्याय आहे. ममतादीदींनी सत्तेपायी पश्चिम बंगालला उद्ध्वस्त केले. आता सत्ता जाणार या भीतीपोटी त्या राज्याचे आणखी नुकसान करीत आहेत. ममतादीदींना पश्चिम बंगालमधील माता-भगिनींची नाही, तर स्वत:ची खुर्ची, पुतण्या आणि समर्थकांची चिंता आहे, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतादीदींना लगावला.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply