महापालिकेचा उपक्रम
पनवेल : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त पनवेल व कळंबोलीत पायी रॅली (पदयात्रा), स्वच्छता मोहीम आणि खारघरमध्ये सायकल रॅलीचे आयोजन महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. 17) करण्यात आले होते. या रॅलीला तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळाला.
पनवेल महापालिका मुख्यालय ते वडाळे तलावदरम्यान काढण्यात आलेल्या पायी रॅलीत आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेलमधील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष, लेखा परीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, माजी नगरसेवक-नगरसेविका सहभागी झाले होते.
केंद्र शासनामार्फत स्वच्छ अमृत महोत्सव 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान पनवेल महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या स्वच्छतेमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवा, शहराशी आपुलकीचे नाते निर्माण व्हावे दृष्टीने शनिवारी खारघरमध्ये सायकल रॅली आणि पनवेल, कळंबोलीमध्ये पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन स्वच्छता लीगच्या या रॅलीमध्ये विविध महाविद्यालये, शाळा, पर्यावरण संघटना, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाची पनवेल महापालिका हद्दीत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. केंद्राच्या वतीने राबविण्यात येणार्या इंडियन स्वच्छता लीग उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेने आपली पनवेल चॅम्पियन्स ही टीम तयार केली आहे. 19 वर्षांखालील गटातील जागतिक मानांकनामध्ये चौथा क्रमांक प्राप्त करणारी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष ही या टीमची कॅप्टन आहे.
पनवेल प्रभागात महापालिकेच्या मुख्य कार्यालयापासून पायी रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत सुमारे साडेतीन हजार महाविद्यालयीन तरुण-तरुणी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. उपस्थितांना महापालिकेमार्फत इंडियन स्वच्छता लीगचा लोगो असणारा टी-शर्ट, टोपी, विशेष बिल्ला यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी व उपस्थितांच्या हातामध्ये स्वच्छतेचा संदेश देणारे फलक व इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेले विशेष झेंडे यामुळे ही रॅली खूपच खुलून दिसत होती. या रॅलीची सांगता ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वडाळे तलाव येथे झाली. या ठिकाणी सर्व उपस्थितांनी एकत्रितरित्या राष्ट्रगीताचे गायन केले. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर वडाळे तलावापाशी सेल्फी पॉईंटची निर्मिती महापालिकेमार्फत करण्यात आली होती. याचासुद्धा आनंद अनेक उपस्थितांनी घेतला.
खारघर प्रभागात उपायुक्त विठ्ठल डाके आणि उपायुक्त गणेश शेटे यांच्या उपस्थितीत उत्सव चौक ते गुरूद्वारादरम्यान सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीस तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीत सुमारे दीड हजार नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. सायकल रॅली झाल्यानंतर पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असणार्या खारघर येथील पांडव लेणी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतदेखील नागरिकांनी पुढाकार घेऊन सहभाग नोंदविला.
कळंबोली प्रभागात उपायुक्त कैलास गावडे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांच्या उपस्थितीत कळंंबोली बस डेपो ते एमजीएम रुग्णालय व पोस्ट ऑफिसमार्गे पुन्हा बस डेपो अशी पायी रॅली करण्यात आली. यात सहभागी विद्यार्थी व नागरिकांनी रॅलीच्या सुरुवातीला स्वच्छतेची शपथ घेतली. यामध्ये जवळपास अडीच हजार शालेय विद्यार्थी आणि तरुणांनी सहभाग घेतला. या रॅलीत उपस्थित विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृतीपर तसेच देशभक्तीपर घोषणा दिल्याने कळंबोली परिसर दुमदुमून गेला होतो. कळंबोली येथील रॅलीत परिसरामध्ये सफाई कर्मचार्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेला सेल्फी पॉईंट हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला.
विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
पनवेल येथील रॅलीत सीकेटी कॉलेज, आयटीएम कॉलेज, बांठिया हायस्कूल, बार्न्स हायस्कूल, काळसेकर कॉलेज, व्ही. के. हायस्कूल, के.वी. कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कळंबोलीतील रॅलीत सुधागड विद्यालय, केएलई महाविद्यालय, सेंट जोसेफ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, खारघरमधील सायकल रॅलीत रामशेठ पब्लिक स्कूल, सरस्वती स्कूल एनएसएस ग्रुप, तेरणा कॉलेज, सुधागड विद्यालय कोपराच्या विद्यार्थ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.