Breaking News

बबनरावांचा विमान प्रवास

आमच्या सोसायटीत राहणार्‍या बबनरावांना विमानाबद्दल खूप कौतुक. त्यांना विमान प्रवास करण्याची हौस आहे, पण ते परवडणारे नसल्याने दुधाची तहान ताकावर म्हणून त्यांनी रावतेंच्या शिवशाहीने गावाला जाऊन यावे असे ठरवले. मला म्हणाले, पनवेलमध्ये उन्हाळा वाढला आहे. त्यामुळे जरा गावी जाऊन येतो. दिवाकररावांनी सामान्य माणसाला विमान प्रवासाचा अनुभव देण्यासाठी  ’शिवशाही’ आणली आहे, असे म्हणतात. त्यात बसून सेल्फी काढून गावाला पाठवतो म्हणजे विमानात बसल्याने गावात माझा रूबाब वाढेल. (हल्ली प्लास्टिकचे छोटे स्टूल एका बाजूला धरून विमानाच्या खिडकीचा भास निर्माण करून फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपवर मित्रांना पाठवण्याची क्रेझ आली आहे.) शिवशाहीत विमानातल्या सारखी हवाई सुंदरीही असल्याची माहिती त्यांनी पुरवली.       

महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मोठा गाजावाजा करून दोन हजार शिवशाही बसेस एसटीच्या ताफ्यात आणल्या. त्यापैकी फक्त 500  एसटी महामंडळाच्या मालकीच्या आहेत, तर 1500  गाड्या भाड्याने घेतल्या होत्या. त्यापैकी 530 सध्या रस्त्यावर आहेत. या गाड्यांवर वाहक एसटीचे असले तरी चालक ठेकेदाराचे आहेत. त्यांना कोणतेही प्रशिक्षण दिले नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शिवशाही गाडीच्या एका चालकानेच  सांगितले की, आपण ठाण्याच्या खोपट येथील ठेकेदाराच्या कार्यालयात जाऊन वाहन चालवण्याचा परवाना आणि बॅच दाखवल्यावर मेडिकलसाठी पाठवले. मेडिकल झाल्यावर नेमणुकीचे पत्र देऊन आगारात पाठवले. तेथे गेल्यावर कोणतीही चाचणी न घेता ड्यूटी लावण्यात आली. त्यापूर्वी मी जीप किंवा कार चालवायचो. ठेकेदार आपल्या फायद्यासाठी विनाप्रशिक्षित चालक

शिवशाहीसाठी नेमत असल्याने  आतापर्यंत एका वर्षात 439 शिवशाहीचे अपघात झाले आहेत. त्यापैकी 36 प्राणांतिक, 297 गंभीर आणि 106 किरकोळ अपघात आहेत. याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल यांना विचारले असता त्यांनी  शिवशाहीच्या चालकांना शॉर्ट ट्रेनिंग ठेकेदार देतो. त्यांना गाडी येत असल्याने आणखी ट्रेनिंगची गरज नसते, पण यापुढे त्यांच्यासाठी ठेकेदारालाही ट्रेनिंगचे शेड्यूल दिले आहे, असे सांगून एकप्रकारे विनाप्रशिक्षित चालक असल्याचे मान्यच केले आहे. अशा शिवशाही गाडीतून बबनराव विमान प्रवासाचा अनुभव घ्यायला

निघाले होते. 

बबनराव गावाला जायच्या दिवशी संध्याकाळी मला स्टँडवर घेऊन आले. काय सांगू राव या शिवशाहीचे कौतुक,

पांढराशुभ्र रंग, त्यावर भगवा पट्टा व उधळलेले चार अश्व, भगव्या रंगात

’शिवशाही’ लिहिलेले, काचेवर तीन भगवे ध्वज, आतमध्ये पुशबॅक सीट, गाणी ऐकण्यासाठी स्पीकर, प्रत्येक सीटला मोबाइल चार्जर आणि गारेगार हवा. दिवाकररावांचे कौतुक वाटले की राव. बबनराव मात्र सेल्फी काढण्यातच मग्न होते. तेवढ्यात एक चॉकलेटी रंगाचे जाकीट घातलेली सावळ्या रंगाची ललना गळ्यात तिकिटाचे मशीन अडकवून गाडीत आली. वाटले आता ती आपल्या नाजूक आवाजात शिवशाहीत आपले स्वागत आहे म्हणून हवाई

सुंदरीसारखे आपत्कालीन परिस्थितीत गाडीतून कशी उडी मारायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवेल आणि मग सर, तुम्हाला काही हवे का, असे विचारेल. तिला काय सांगावे याचा विचार करीत असतानाच आमचे स्वप्न भंगले. म्हणतात ना मन चिंती ते वैरी ना चिंती. अहो, स्वागत राहिले बाजूला मधले कुणी गाडीत बसले असेल तर खाली उतरा, असे भसाड्या आवाजात ओरडून ती मोबाइलमध्ये गुंग झाली.  

बबनरावांना तिच्याशी बोलायचं होतं, पण तंबाखूचा बार त्यांच्या तोंडात होता आणि पिचकारी उडवायची तर काच बंद. आता पिचकारी टाकायची तरी कशी. मग त्यांनी मलाच विचारले, समोर बाटली ठेवायला जागा हाय राव. मग पिकदाणी का नाय? मी त्यांच्याकडे लक्ष न देता ती पुन्हा ओरडण्यापूर्वी गाडीतून खाली उतरलो. (काय सांगावे नाहीतर कडेलोट

व्हायचा) मनात विचार आले, लाल -पिवळ्या रंगाच्या मोडक्या सीट असलेल्या गाडीतून फिरणार्‍या रयतेला शिवशाहीतून विमानात बसल्याचा अनुभव दिल्यावर दिवाकरराव रणजीतबाबूंना नक्कीच म्हणाले असतील की, कामगार आणि रयतेला कसं थंडगार केलं. अहो, हीच तर शिवशाही आहे ना.

बाटलीवरून आठवण झाली  शिवशाही चालकाने गटारी साजरी केल्याने रत्नागिरीहून बोरिवलीला जाणारी गाडी निवळी येथे नियोजित थांब्यावर प्रवासी चढ-उतार करण्यासाठी थांबवली असता चालक गाडी सोडून निघून गेला. बराच वेळ झाल्यावर प्रवाशांनी शोधाशोध केल्यावर मद्यप्राशन करून तो एका टपरीवर आडवा झालेला सापडला. रत्नागिरीला कळवून प्रशासनाकडून मदत मिळेपर्यंत तिथल्या एका हॉटेलचा प्रवाशांना आसरा घ्यावा लागला. (विमानाला उशीर झाल्यावर प्रवाशांना हॉटेलचा आसरा घ्यावा लागतो.) रात्री उशिरा एसटीचे अधिकारी दुसरा चालक घेऊन आल्यावर गाडी पुढे निघाल्याचे वाचल्याचे आठवले. मग मी बबनरावांना शिवशाही प्रवासासाठी शुभेच्छा देऊन घरचा रस्ता धरला.      

त्यावेळी मला पनवेल स्थानकावरील ते दृश्य दिसले. मधल्या शेडसमोर घाटावर जाणार्‍या गाड्या उभ्या राहिल्या की एक-एक जण धावत येऊन  नवीन पनवेलच्या दिशेला पाण्याच्या टाकीच्या बाजूला भिंतीकडे तोंड करीत उभे राहत होते. बहुतेक ते बारामतीवाले असावेत. तिथे लांबच लांब भिंत पाहून धरण कोरडे पडले असावे असे त्यांना वाटत असेल. पनवेलमधील पाणीटंचाईवर उपाय म्हणून असेल कदाचित त्यांनी आपल्या दादांना त्रास नको असा सुज्ञ विचार केला असेल.

त्यावेळी एक मल्ल्या भक्तही धावत आला. खिशातून बाटली काढत पटकन तोंडाला लावली. त्याचे पाहून लगेच दुसरा आला. त्यावेळी दिवाकररावांनी कानिफनाथ

गुराळासारखी मल्ल्या अ‍ॅण्ड सन्सला टक्केवारीवर प्रत्येक स्थानकात जागा दिली, तर एसटीचा तोटा नक्कीच कमी होऊ शकेल, असा विचार माझ्या मनात डोकावला.

– नितीन देशमुख

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply