Breaking News

घरे उभारणारेच होताहेत बेघर

नाका कामगारांचे जीवन असुरक्षित मुलांच्या नशिबीही बिगारीचे काम

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसराने वेढलेला भाग असल्याने या परिसरात नव्याने उभी राहणारी गृहसंकुले, औद्योगिक वसाहत, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आदी कामांकरीता ठेकेदारांकडे बिगारी कामे निघत आहेत. या कामांकरीता मोहोपाडा रसायनी परीसरात नाका कामगार मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यांना रोजंदारीचे चांगले आमिषही दाखविले जात आहे मात्र त्यांच्या हक्काचे पैसे देण्याची वेळ येते. त्यावेळी त्यांना भांडल्याशिवाय ते पैसे मिळत नसल्याचे वास्तव आहे. कष्टाच्या, बिगारी कामासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी भागातील माणसे काम मिळेल या अपेक्षेने सकाळी साडेसात वाजल्यापासून परिसरातील मोहोपाडा मिनीडोअर असल्याने मोहोपाडा व वावेघर नाका थांब्याजवळ तसेच वावेघर नाक्यावर उभे असतात. या नाका कामगारांना दिवसाकाठी 600 रुपये हजेरी मिळते. बिगारी 500 ते 600 व महिला बिगारीला 400 ते 450 अशी मजुरी मिळत असल्याने मोहोपाडा व वावेघर नाका सकाळी नाका कामगारांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. येथील नाका कामगारांच्या हाताला काम मिळत असले तरी दाम मात्र भांडून घ्यावे लागत आहे. यामुळे कामगारांना हक्कासाठी झगडावे लागत आहे. वेठबिगारी नाका कामगारांच्या पाचवीला पुजली आहे. बांधकाम क्षेत्रात राहून लोकांची घरे उभारणारे हात बेघर असल्याने जमिनीवर झोपड्या उभारुन काही कुटुंबे जीवन जगताना दिसतात. काही ठेकेदार बिगारीचे काम करणार्‍या कामगारांना वेठबिगारीप्रमाणे राबवून घेत असल्याचे कामगार प्रतिनिधी बद्रीनाथ चव्हाण यांनी सांगितले.

जीव धोक्यात

बिगारीचे काम करताना बहुमजली इमारतींच्या कामावर जीव, धोक्यात घालून लक्ष द्यावे लागते. या नाका कामगारांचे जीवन असुरक्षित असून या कामगारांना शासनाच्या किमान वेतन व इतर सुविधा मिळणे गरजेचे आहे. कामाची हमी नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील भेडसावत असल्याने मुलांच्या नशिबीसुध्दा बिगारी काम असल्याची स्थिती निर्माण झाल्याचे नाका कामगारांचे म्हणणे आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply