काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबतच्या आभारप्रदर्शन ठरावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यावर बेफाम आरोप केले. त्या आरोपांना ना शेंडा होता, ना बुडखा. खरे तर, मोदी यांना अशाप्रकारे प्रश्न विचारणे हे कुठल्याही काँग्रेस खासदारासाठी हास्यास्पदच ठरते. राहुल गांधी हे स्वत: गैरव्यवहारांच्या आरोपांखाली जामिनावर आहेत. अशा लोकांना मोदींसारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेतृत्वाला प्रश्न विचारण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.
‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेतर्फे अदानी उद्योग समुहावर जे कथित आरोप झाले, त्याने देशभर काहुर माजले होते. शेअरबाजाराची प्रचंड पडझड झालीच आणि शिवाय केंद्र सरकारवर अनेक आरोप झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक तुटून पडले. हे स्वाभाविकच होते. अशा एखाद्या प्रकरणात सत्ताधार्यांना जाब विचारण्याचा अधिकार विरोधीपक्षाला असतोच. संसदेचे अधिवेशन सुरू होण्याचा मुहुर्त साधून हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने अदानी उद्योगसमुहावर तडाखेबंद हल्ला चढवत आरोपांची राळ उठवली होती. हिंडेनबर्ग रिसर्च ही काही सोवळी आर्थिक संशोधन संस्था नव्हे. जगभरातील शेअरबाजारांमध्ये शॉर्टसेलिंगचा फायदा उकळणारी ही एक कंपनी आहे. म्हणजेच एखाद्या कंपनीचा शेअर चढ्या भावात विकला जाणार असेल तर काहीतरी घातपात करून किंवा त्या कंपनीची बदनामी करून शेअरचे भाव खाली आणायचे आणि कमी दरांमध्ये तेच शेअर विकत घेऊन अल्पावधीत विकून टाकायचे. याचा अर्थ कमी पैसे खर्च करून जास्तीत जास्त नफा उकळण्याचा हा शॉर्टकट आहे. विशेष म्हणजे यामध्ये बेकायदा असे काहीही नाही. अदानी उद्योगसमुहात भारतीय राष्ट्रियीकृत बँका आणि एलआयसी यांच्या प्रचंड प्रमाणात गुंतवणुका आहेत किंवा त्यांनी अदानी समुहाला कर्जे दिलेली आहेत. या मुद्दयावर विरोधी पक्षांनी मोदी सरकारला धारेवर धरले. उद्योजक गौतम अदानी आणि मोदी यांचा संबंध काय, अदानी यांच्या विमानातून पंतप्रधानांनी किती वेळा प्रवास केला अशा प्रकारचे अत्यंत उथळ आणि अभ्यासशून्य प्रश्नवजा आरोप राहुल गांधी यांनी केले. त्यामुळे देशभरातील मोदी समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली नसती तरच नवल. पंतप्रधान मोदी यांनी ठरावाला उत्तर देताना बुधवारी संसदेमध्ये या सर्व आरोपांची दखल घेतली. ती घेत असतानाच गेल्या नऊ वर्षांत आपल्या सरकारने करून ठेवलेल्या प्रचंड कामाचा पाढा वाचून विरोधकांची तोंडे गप्प केली. राहुल गांधी किंवा विरोधी पक्षातील अन्य कुणीही संसदेमध्ये अभ्यास करून बोलत नाहीत. एकेकाळी याच संसदेमध्ये अभ्यास, चिंतन आणि मनन करणारे विरोधक होते. अभ्यासपूर्ण समीक्षेनंतर त्यांना तोंड देणे सत्ताधार्यांना जड जात असे, परंतु अशा प्रकारे सकारात्मक टीका करणारा विरोधी खासदार गेल्या नऊ वर्षांत आपल्याला भेटलेला नाही, अशी खंत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. ती रास्तच म्हणायला हवी. सकारात्मक टीका आणि नकारात्मक वितंडवाद यामध्ये खूप फरक असतो. राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे दगड मारून पळून जाण्याचा प्रकार वाटतो. अशा प्रकारचे राजकारण जनता कधीही स्वीकारत नाही. त्यादृष्टीने पाहू गेल्यास काँग्रेस पक्ष नऊ वर्षांपूर्वी सत्ताधारी म्हणून नापास झाला. तसाच तो आता विरोधी पक्ष म्हणूनदेखील अपयशी ठरत आहे. यापुढे संसदेत तरी तयारी करून जाण्याचे राहुल गांधी यांनी ठरवावे.
Check Also
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!
मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper