Breaking News

दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विधायक कार्य प्रेरणादायी -मंत्री रवींद्र चव्हाण

भाजप जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन, पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यांची मेहनत, कर्तृत्व आणि जिद्द विधायक कार्याला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 28) येथे केले.
भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा कार्यालय पनवेल तालुक्यातील डेरवली येथे उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन तसेच पनवेल शहरातील रूपाली सिनेमागृहाजवळील नूतनीकरण केलेल्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ना. चव्हाण बोलत होते.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोकणाच्या प्रवेशद्वारावर भाजपचे जिल्हा कार्यालय असावे ही पक्षाची इच्छा होती. त्यानुसार जागेचा शोध सुरू झाला. शोधाशोध असताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी जागा शोधण्याची गरज नाही आम्ही आमची जागा विनाशुल्क देतो, असे तत्काळ सांगितले आणि ते तेवढ्यावर थांबले नाहीत तर ती कृती प्रत्यक्षात आज झाली. लोकनेते रामशेठ ठाकूर दानशूर आहेत हे नव्याने सांगायची गरज नाही. त्याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला आहे. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत मी त्यांना जवळून पाहिले आहे. दिवसरात्र मेहनत करीत त्यांनी महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवून दिली. तरुणाला लाजवेल अशी त्यांची मेहनत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर आहे. एखादी गोष्ट ठरवली तर ती ते पूर्ण करणारच. त्यामुळे त्यांच्यापुढे आपण सर्व छोटे कार्यकर्ते आहोत. 2024मध्ये आपल्याला प्रचंड यश मिळवायचे आहे. त्यामुळे संघटनात्मक शत प्रतिशत आणि सशक्त भारत बनविण्यासाठी सज्ज राहूया, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, उत्तर रायगड जिल्हा चार तालुका, महापालिका असा आणि मोठी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. या ठिकाणी देशभरातून नागरिक वास्तव्यास असून सर्व देशाचे लक्ष या भागात आहे. येथे आलेला प्रत्येक व्यक्ती आपला झाला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. त्यानुसार जिल्हा कार्यालयाची गरज होती. ती या निमित्ताने पूर्ण होत असून आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाला हे कार्यालय उपयुक्त ठरणार आहे. आपला पक्ष जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे उत्तर रायगड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला होण्यासाठी आणि पक्ष मजबुतीसाठी सतत कार्यरत राहूया, असेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकपर भाषणात उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले की, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज कार्यालय असावे असे मानस केला होता. त्यानुसार कार्यालयासाठी जागा शोधत असताना लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोणताही विचार न करता डेरवली येथील 24.3 गुंठे जागा दिली. एवढेच नाही, तर त्या जागेचे दानपत्र करून पक्षाच्या नावावर जागा केली. हे काम फक्त लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबच करू शकतात, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रमास कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, सी. सी. भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, उरण मंडल अध्यक्ष रवी भोईर, खालापूर मंडल अध्यक्ष रामदास ठोंबरे, खोपोली मंडल अध्यक्ष रमेश रेटरेकर, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply