Breaking News

कर्जतमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -मंत्री रवींद्र चव्हाण

कर्जत : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष जनसामान्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणारा हा पक्ष असून तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अव्वल ठिकाणी नेण्यासाठी तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे रहा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.1) येथे केले.
माजी आमदार सुरेश लाड समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते. शेळके मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, धैर्यशील पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, उपाध्यक्ष वसंत भोईर, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, शहराध्यक्ष विजय जिनगरे, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, माथेरान अध्यक्ष प्रवीण सकपाळ, खोपोली शहराध्यक्ष रमेश रेठरेकर, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, जि.प.चे माजी सभापती नरेश पाटील, माजी पं.स. सभापती तानाजी चव्हाण, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, नितीन कांदळगावकर, रणजीत जैन, सागर शेळके, शर्वरी कांबळे आदी उपस्थित होते.
मंत्री रवींद्र चव्हाण आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असला तरी तो जनसामान्यांसाठी काम करीत असतो. सुरेश लाड यांनी कोणताही कार्यकर्ता दुखावला जाणार नाही याची काळजी घेतली. त्यांच्याबरोबर आम्ही बैठक घेतली असता त्यांनी स्वार्थासाठी येणे मला पटत नाही. सर्व सहकार्‍यांना विचारात घेऊन मी निर्णय घेईन, असे सांगितले. राजकारणात असा विचार करणारे फार थोडे आहेत. असे सात्विक नेतृत्व आम्ही पाहिले नाही. आज परिवार म्हणून तुम्ही सर्वजण भाजपमध्ये दाखल झाला आहेत. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करीत आहेत, ते सर्वांना भावले आहे. त्यांनी अनेक योजना गोरगरीब व सर्वसामान्यांसाठी आणल्या आहेत. यापूर्वीही अनेक योजना आल्या आणि त्या कधी गेल्या ते समजले नाही, पण मोदी सरकारच्या योजना जनतेचे भले करणार्‍या व त्यांच्यापर्यंत पोहचणार्‍या आहेत, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सुरेश लाड एक विश्वासू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी स्वतःसाठी नाही, तर लोकांसाठी काम केले आहे. पुढे बोलताना त्यांनी मुंबई आपल्याला जवळ आणण्यासाठी शिवडी-न्हावा 23 किमीचा रस्ता समुद्रातून केला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी होणार आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी या, असे निमंत्रण दिले.
माजी आमदार सुरेश लाड यांनी सांगितले की, अजूनही मतदारसंघात खूप विकासकामे करायची आहेत. खालापूरमधील औद्योगिकरण आणि त्यापासूनच्या समस्या आहेत. नदी शुद्धीकरणाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पुढल्या काळात मतदारसंघात पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करेन. खासदार, आमदार, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आपल्या विचारांच्या पक्षाच्या आल्या, तर आपण जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष होऊ.
माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी, माजी आमदार सुरेश लाड यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात आपला पक्ष मोठा झाला आहे, असे अधोरेखित केले. जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी हा सोहळा आपल्या सर्वांना ऊर्जा देणारा असल्याचे म्हटले. प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी सुरेश लाड चुकीच्या पक्षात होते. ते आता चांगल्या पक्षात आले आहेत, असे नमूद केले. जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी प्रास्तविकात सुरेश लाड यांनी कर्जत मतदारसंघात खूप कामे केली आहेत, असे सांगितले. विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी कर्जत मतदारसंघात हल्ली काही माणसे उड्या मारत आहेत, पण त्यांचे काय होणार आहे हे त्यांना लवकरच कळेल, असा टोला लगावला. उपस्थितांचे स्वागत मंडल अध्यक्ष राजेश भगत यांनी स्वागत केले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, पुष्पा दगडे, शीतल लाड, प्रतीक्षा लाड, मोनिका बडेकर, संदीप पाटील, स्नेहा गोगटे, राजू हजारे, नंदू लाड, विजय हजारे, जगदीश ठाकरे, सूर्यकांत गुप्ता, मंदार मेहेंदळे, प्रदीप घावरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जगदीश मराजगे आणि नम्रता कांदळगावकर यांनी केले.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply