पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आठ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर खारघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलताना माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उत्तम अभिनयासाठी प्रशिक्षण शिबिर महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन केले.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या शिबिराच्या उद्घाटन समारंभाला भाजप खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, नेत्रा पाटील, युवा अध्यक्ष नितेश पाटील, संध्या शारबिद्रेे, पनवेल महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, स्मिता गांधी,समीर कदम, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, अमोल खेर तसेच प्रशिक्षक प्रा. रवि धुतडमल, संकेत खेडकर आणि रंगकर्मी उपस्थित होते.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की, रोजच्या आयुष्यात आपणा सर्वांना अभिनय करावा लागतो, परंतु उत्तम अभिनय करण्यासाठी आवाजातील चढ-उतार, शैली, कौशल्याची गरज असते. त्यासाठी या अशा अभिनय शिबिराची गरज आहे. नेहमीच्या रूटीन उपक्रमांपेक्षा मनपाच्या वतीने होत असलेला हा उपक्रम निश्चितच आगळावेगळा असून तो अभिनंदनीय असा आहे. खारघरकरांसाठी या परिसरात एका नाट्यगृहाची आवश्यकता असून लवकरच ती पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ब्रिजेश ठाकूर यांनीही शिबिरासाठी शुभेच्छा देत अभिनय प्रशिक्षण हा उपक्रम खारघरमध्ये घेतल्याबद्दल मनपाचे व नाट्य परिषदेचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. राजू पाटोदकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्यामनाथ पुंडे यांनी मानले.
पनवेलमधील नाट्यकलावंतांना अभिनयासाठी आवश्यक असणार्या गुणांचा विकास होण्यासाठी प्रशिक्षण मिळावे याकरिता महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी पुढाकार घेऊन आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सहकार्यातून सर्वांसाठी विनामूल्य असे हे अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.
अभिनय प्रशिक्षण शिबिराला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 आणि सायंकाळी 5 ते 8 अशा तीन सत्रात शिबिर होणार आहे. त्याचप्रमाणे दोन गटात ते घेण्यात येत आहे. यामध्ये पहिला गट वय 8 ते 16 आणि दुसरा गट 16 ते 60 वयापर्यंत आहे. आठ दिवस हे शिबिर चालणार आहे.
या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून नाट्य कलावंत दिग्दर्शक अशोक केंद्रे (मुंबई), मूक अभिनय अभ्यासक संकेत खेडकर (अहिल्यानगर), प्रा. रवी धुताडमल (रिपर्टरी थिएटर-एनएसडी)
प्रा. डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक कलावंत धनंजय सरदेशपांडे (पुणे), निर्माता, दिग्दर्शक व कलावंत राजेश पाठक (कल्याण), ज्येष्ठ रंगकर्मी संतोष बोंदरे (अलिबाग) व इतर दिग्गज कलावंताचे मार्गदर्शन लाभणार आहे. शेवटच्या दिवशी सहभागी सर्व शिबिरार्थींचे सादरीकरण होईल तसेच त्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
Check Also
खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …
RamPrahar – The Panvel Daily Paper