रात्र ही झोपण्यासाठी असते आणि रात्री चांगली झोप लागली की दुसर्या दिवशी सकाळी मन ताजेतवाने, प्रफुल्लित असते आणि नवीन कामाला हुरूप येतो हे आता मुंबईसारख्या वेगवान आणि चोवीस तास कार्यरत असलेल्या शहरात जणू अर्धसत्य झाले आहे, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला लवकर झोप बघू असे सांगणे कालबाह्य झाले आहे…
मुंबईच्या मल्टीप्लेक्समध्ये रात्री अकरा साडेअकराला मिडनाईट मॅटीनी शो सुरू होऊनही दशकभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर’च्या खणखणीत यशाने अनेक मल्टीप्लेक्समध्ये याच मिडनाईट मॅटीनी शोची संख्या वाढलीदेखील. पिक्चर चालतो तेव्हा अनेक गोष्टी चालतात. ब्रेकिंग न्यूजपासून रिलपर्यंत… चित्रपटाच्या जगात यशासारखे सुंदर आणि महत्त्वाचं असे काहीही नसते. पिक्चर सुपरहिट है तो सबकुछ फिट्ट है असा हा मामला आहे. चित्रपट सुपरहिट झाला रे झाला की चित्रपटसृष्टीतील अनेक लहान मोठ्या समस्या, चिंता (त्या का करतात?), विवंचना अचानक दूर जातात. आता ‘धुरंदर’च्या खणखणीत यशाने काही मल्टीप्लेक्समधील रात्रीच्या खेळाच्या वेळा अशा झाल्या, रात्री बारा वाजून पन्नास मिनिटे, रात्री एक वाजून पंचवीस मिनिटे, त्यानंतर रात्री अडीच, तीन, साडेतीन, पहाटे चार वाजता. अगदी पुणे शहरातही एका मल्टीप्लेक्समध्ये रात्री सव्वा बारा वाजता एक खेळ.
चित्रपटासाठीच्या या वेळा आश्चर्यचकित व्हावे अशा आहेत. या नक्की कोणासाठी आहेत? उच्चभ्रू आणि नवश्रीमंत वर्गातील गाडीवाल्या चित्रपट रसिकांसाठी आहेत. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात हा उच्च मध्यमवर्ग अधिक श्रीमंत झाला आणि त्याचे थेट परिणाम चित्रपट संस्कृतीवरही दिसू लागले. त्याची सुरुवात राजश्री प्रॉडक्शन निर्मित व सुरजकुमार बडजात्या दिग्दर्शित हम आपके है कौन (1994) या चित्रपटाने झाली. मुंबईत एकमेव चित्रपटगृह लिबर्टीत हा चित्रपट प्रदर्शित होताना शनिवार आणि रविवार या दिवशी तिकीटाचे दर चांगलेच चढे होते. बाल्कनीचा तिकीट दर चक्क तीन आकडी होता. ही एका नवीन युगाची सुरुवात होती. तेव्हा जे पेरले गेले ते आता मोठ्याच प्रमाणावर उगवले आहे.
नवीन दशकाच्या सुरुवातीला मोठ्या शहरात आलेले मल्टीप्लेक्स युग काही फार फार वर्षांनी फोफावले. त्याचे हायफाय व्यक्तीमत्व आणि तिकीटाचे चढे दर यांनी आपल्या देशात चित्रपट रूजवलेल्या, वाढविलेल्या अशा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय अशा टाळ्या शिट्यांंनी थिएटर डोक्यावर घेऊन पिक्चर एन्जॉय करत करत मजेत असलेल्या मास अपिलला मागे सारले.
मल्टीप्लेक्स कोणासाठी आहेत? तर स्वतःची चार चाकी गाडी असणारे, महागडे तिकीट ऑनलाईन बुक करणारे, समोसा पॉपकॉर्न आणि शीतपेये यांचा आस्वाद घेत घेत चित्रपट पाहणारे, यांच्यासाठी! अशी एक सर्वसाधारण व्याख्या.
तसं पाहिलं तर रात्रीचा चित्रपट हा खेळ नवा नाही. आपल्या देशात 1982 साली रंगीत दूरदर्शन व चित्रफित (व्हिडीओ) यांचे आगमन झाले आणि मग साखरपुडा, लग्न, बारसे, सत्यनारायण पूजा, वाढदिवस अशा निमित्ताने
चाळीचाळीतून भाड्याने व्हीसीआर आणणं, अख्खा चाळीने गोणपाट, वृत्तपत्र अथवा आपली घरातील खुर्ची बाहेर टाकून सगळ्यांनी दाटीवाटीने बसून पिक्चर एन्जॉय करणं सुरू केलं तेव्हाच ही रात्रभरचा पिक्चर रूजत गेला. दहा पंधरा रुपयांत एका चित्रपटाची व्हिडीओ कॅसेट भाड्याने आणायची आणि एका रात्रीत चार चित्रपट पहायचा आनंद घ्यायचा असे अगदी सोप्पे गणित. पिक्चर कोणाचे? तर मिथुन चक्रवर्तीचे. डोक्याला कसलाही ताप वा शॉट नाही. त्याची तीन चार भन्नाट नृत्य (त्यात डिस्को डान्स आहेच) आणि त्याची ढिश्यूम ढिश्यूम मारधाड. एकदम पैसा वसूल मनोरंजन. त्याचे सुरक्षा, वारदात, डिस्को डान्सर, डान्स डान्स, कसम पैदा करने वाले की, मकसद हे चित्रपट गल्लीबोळातून, चाळीचाळीतून पाहिले गेलेत. भले त्याच्या सुपरहिट चित्रपटांना प्रतिष्ठा नसेल, पण हुकमी प्रेक्षकवर्ग होता.
त्या दिवसात रात्रीच्या बससेवेत प्रवासात व्हिडीओवर एक दोन चित्रपट हमखास पाहता येई. त्यात अमिताभ बच्चनच्या कुली, शान, शक्ती, मुकद्दर का सिकंदर, याराना, लावारिस अशा चित्रपटांना स्थान असे. रात्रीच्या प्रवासात कंटाळा येऊ नये म्हणून ही सोय होती. चित्रपट कसा पहावा यापेक्षा चित्रपट कसाही पहावा हेच खरे.
रजनीकांत क्रेझने नवीन चित्रपटाचा पहिल्या दिवशी शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताचा खेळ ही संस्कृती रूजवली. या खेळासाठी त्याचे चाहते ढोल ताशा बॅण्ड बाजा वाजवत, नाचत येणं आणि रजनीकांतच्या भल्या मोठ्या कटआऊटला दुधाची अंघोळ घालणे ही चित्रपट रसिक संस्कृती एकदम भन्नाट. यातून चित्रपट रसिकांमधील आणखी एक वैशिष्ट्य दिसून येते. रजनीकांतवरील प्रेमाखातर हे सगळे असते. रजनीकांतच्या चित्रपटात पाहण्यासारखे असं असते तर काय या प्रश्नापेक्षा त्याच्या चित्रपटाचे हे उत्स्फूर्त स्वागत खूप खूप मोठी गोष्ट. तात्पर्य, रजनीकांतचा पिक्चर पाहण्यासाठी रात्रीपासून वाट पाहिली जाते.
मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप, ओटीटी युगात आपण चित्रपट कधी पहायचा हे आपण ठरवतो. मग ती वेळ रात्री उशिरा अथवा पहाटे लवकरची असू शकते. काय फरक पडतो? म्हणजे पुन्हा तेच, रात्रीस सिनेमाचा खेळ चाले…
फार पूर्वी एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स संस्कृतीत सिनेमाची वेळ जणू ठरलेली. सकाळी साडेअकरा वाजताचा खेळ हा मॅटीनी शो आणि मग दिवसा तीन खेळ तीन, सहा आणि रात्री नऊ… यात चित्रपट चौदा रिळाचा असेल तर साडेतीन, साडेसहा आणि साडेनऊ वाजता आणि चित्रपट अठरा, वीस रिळाचा असेल तर अडीच, साडेपाच आणि नऊ अशी.
चित्रपट रसिकांच्या अनेक पिढ्यांनी चित्रपटगृहाच्या अशा वेळा जणू पाळल्या. ती एक सांस्कृतिक सवय होती. नव्वदच्या दशकाच्या अखेरीपर्यत तर चित्रपटाचा रात्रीचा खेळ पहायचा तर फार लांबचे चित्रपटगृह नको अशी भावना असे.
तालुक्याच्या ठिकाणचे चित्रपटगृह असो किंवा खेड्यापाड्यांतील थिएटर असो, रात्रीचा खेळ बारा वाजता संपवला जाई. आमिर खान निर्मित आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान (2001)मधील क्रिकेट सामन्यावर ग्रामीण भागातील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये चक्क कात्री लावली गेली. रात्री बारा वाजता सिनेमा संपल्यावर टमटम (अथवा सितारा. अर्थात रिक्षा) मिळणे, स्वतःच्या सायकल, स्कूटर, मोटरसायकलने प्रेक्षकांनी गावातील घरी पोहचणे, टेम्पो असेल तर त्यातून जाणे या सगळ्याचा विचार करूनच रात्रीचा चित्रपट बारा वाजता संपवला जाई. (फार पूर्वीच्या काळात गावावरुन बैलगाडी किंवा घोडे गाडीने प्रेक्षक चित्रपट पहायला येत. चित्रपट प्रेक्षक संस्कृती हा असा बहुस्तरीय आणि रंजक विषय) आज मुंबईत मल्टीप्लेक्समध्ये रात्रभर चित्रपट एन्जॉय करण्याची रुजलेली संस्कृती पाहता हा फ्लॅशबॅक भन्नाटच म्हणायचा.
एकदा तर प्रीमियर खेळच रात्री उशिरा सुरू झाला आणि तो पहायला अगदी काही मोजकेच मान्यवर सत्तर एमएमचा रूपेरी पडदा आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम यांच्या समोर होते. तब्बल पन्नास वर्षे हा किस्सा गाजतोय,
जी.पी. सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’च्या मिनर्व्हा चित्रपटगृहातील प्रीमियरला सत्तर एमएमची प्रिंट वेळेवर न पोहचल्याने पस्तीस एमएममध्ये तो खेळ पार पडला आणि तो संपल्यावर सत्तर एमएमची प्रिंट मिनर्व्हावर पोहचली (लंडनमध्ये तांत्रिक प्रगतीने हा चित्रपट सत्तर एमएम करण्यात आला. शोले च्या काही मोजक्याच प्रिंट सत्तर एमएम होत्या.) रात्री उशिरा दिग्दर्शक रमेश सिप्पी, छायाचित्रणकार व्दारका दिवेचा, अमिताभ आणि अशाच काही मोजक्याच जणांनी सत्तर एमएम आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीममध्ये शोले पाहिला…
चित्रपटगृहात रात्री उशिराचा खेळ ही संस्कृती अशी. आता कोणी तिकीट काढून वातानुकूलित व्यवस्थेत केवळ आणि केवळ झोपण्यासाठी रात्रीचा चित्रपट खेळ पहायला जाऊदेखील शकतो… फरक इतकाच की पडद्यावरील डायलॉगबाजीचा आवाज म्यूट करता येणार नाही.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक
RamPrahar – The Panvel Daily Paper