Breaking News

पनवेल महापालिकेत भाजप महायुतीचा ‘षटकार’

सहा उमेदवार बिनविरोध; विरोधकांना हादरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व येथील महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याचा आनंदोत्सव कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 2) भाजप तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालय येथे वाजत गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा केला.
यामध्ये विजयाचा पहिला मान प्रभाग 18 ब मधून भाजपचे उमेदवार नितीन जयराम पाटील यांनी मिळवता होता. त्यानंतर शुक्रवारी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. प्रभाग 18 अ मधून ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग 19 अ मधून दर्शना भगवान भोईर, ब मधून रूचिता गुरूनाथ लोंढे, तर प्रभाग 20 अ मधून अजय तुकाराम बहिरा आणि ब मधून प्रियंका तेजस कांडपिळे यांनी बिनविरोध विजय मिळवला.
या सर्व विजयी शिलेदारांचे पनवेल महापालिका निवडणूक प्रभारी, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. या वेळी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, गणेश कडू, राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’, ‘एकच वादा प्रशांतदादा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे विजयाचा जल्लोष साजरा केला. पनवेलच्या विकासासाठी नागरिकांनी भाजप महायुतीवर दाखवलेला हा विश्वास अधिक जबाबदारीने पेलत परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार या वेळी महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला. या बिनविरोध निवडीमुळे भाजप महायुतीमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले असून विरोधकांना मात्र मोठा हादरा बसला आहे.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply